केवळ भारतात नाही तर अमेरिकेतही ‘धुरंधर’चा दबदबा, रणवीर सिंगच्या सिनेमाने कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:28 IST2026-01-13T14:25:41+5:302026-01-13T14:28:04+5:30
'धुरंधर' निमित्ताने अमेरिकेत अनेक दिवसांनी बॉलिवूडचा डंका पाहायला मिळतोय. जाणून घ्या 'धुरंधर'ची अमेरिकेतील कमाई.

केवळ भारतात नाही तर अमेरिकेतही ‘धुरंधर’चा दबदबा, रणवीर सिंगच्या सिनेमाने कमावले 'इतके' कोटी
रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की बॉलिवूड चित्रपट आता केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. कारण रणवीरच्या 'धुरंधर' सिनेमाने केवळ भारतात नाही तर अमेरिकेतही ऐतिहासिक कामगिरी करुन थक्क करणारी कमाई केली आहे. त्यामुळे 'धुरंधर' निमित्ताने अमेरिकेत अनेक दिवसांनी बॉलिवूडचा डंका पाहायला मिळतोय. जाणून घ्या 'धुरंधर'ची अमेरिकेतील कमाई.
'धुरंधर' सिनेमाने नॉर्थ अमेरिकेत $20 मिलियनहून अधिक ग्रॉस कलेक्शन केले आहे. रणवीरने केवळ मोठे बॉक्स ऑफिस यश मिळवले नाही, तर भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रभावात एक नवे पर्वही जोडले आहे. २० मिलियन म्हणजेच 'धुरंधर'ने अमेरिकन बॉक्स ऑफिसवर तब्बल २ कोटींची कमाई केली आहे. या ऐतिहासिक कमाईमुळे रणवीर सिंग आता प्रभास आणि इतर भारतीय कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे.
'धुरंधर'चं हे बॉक्स ऑफिस कलेक्शन खास आहे कारण, 'धुरंधर' हा 'बाहुबली २' नंतर जवळपास नऊ वर्षांनंतर इतकी कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. नॉर्थ अमेरिकेत 'धुरंधर' पाहण्यासाठी २० लाखांहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती, सलग हाऊसफुल शो आणि पुन्हा-पुन्हा चित्रपट पाहण्याचा वाढता ट्रेंड दिसून आला. यावरुन स्पष्ट होते की हा चित्रपट केवळ भारतीयांपुरता मर्यादित नसून, जागतिक प्रेक्षकांमध्येही त्याने भक्कम पकड निर्माण केली आहे.
रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपट आदित्य धरने दिग्दर्शित केला असून, यामध्ये संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट एका मोठ्या मिशनवर आधारित असून रणवीर यामध्ये एका धाडसी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आदित्य धरने 'धुरंधर'च्या पार्ट २ ची घोषणा केली असून हा सिनेमा १९ मार्च २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.