Ranveer Singh Birthday : शूटींग बघायला आलेल्या रणवीर सिंगला रवीनानं हाकलून दिलं होतं, वाचा काय आहे तो किस्सा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:05 AM2022-07-06T11:05:37+5:302022-07-06T11:07:21+5:30

Ranveer Singh Birthday : रवीनाने सेटवरून चक्क हाकलून लावलं पण अक्षयने कौतुक केलं..., ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये खुद्द रणवीरने हा किस्सा सांगितला होता.

Ranveer Singh Birthday when raveena tandon throw out ranveer singh from the sets of mohra | Ranveer Singh Birthday : शूटींग बघायला आलेल्या रणवीर सिंगला रवीनानं हाकलून दिलं होतं, वाचा काय आहे तो किस्सा?

Ranveer Singh Birthday : शूटींग बघायला आलेल्या रणवीर सिंगला रवीनानं हाकलून दिलं होतं, वाचा काय आहे तो किस्सा?

googlenewsNext

 Ranveer Singh Birthday : बॉलिवूडचा ‘पॉवरहाऊस’ अर्थात रणवीर सिंग  ( Ranveer Singh) याचा आज वाढदिवस.  आज 6 जुलैला रणवीर त्याचा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या अतरंगी फॅशनमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. खरं तर रणवीरची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. पण त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी कदाचित आजही तुम्हाला ठाऊक नसतील.

रणवीर सिंगचं खरं नाव रणवीर भवनानी आहे. मात्र फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी त्याने ते बदललं. रणवीर हा सोनम कपूरचा नातेवाईक आहे. सोनमची आई सुनीता कपूर हिच्या कुटुंबाशी रणवीरचं नातं आहे. आपल्या टॅलेंटच्या जोरावर रणवीरनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण तुम्हाला ठाऊक नसेल की, कधीकाळी याच रणवीरला रवीना टंडनने सेटवरून हाकलून दिलं होतं.  

तर आज आम्ही सेटवरून हाकलून लावलेल्या याच पोराची गोष्ट सांगणार आहोत. होय, 11 वर्षांचं ते बारकं पोर रवीनाच्या  (Raveena Tandon) सेटवर शूटींग पाहायला आलं होतं. पण रवीनाने निर्मात्याला सांगून त्या पोराला सेटवरून हुसकावून लावलं होतं. तेच पोरं पुढे बॉलिवूडचा सुपरस्टार झालं.  
 
बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रणवीरला बराच संघर्ष करावा लागला. अगदी थिएटरमध्ये बॅकस्टेजवर  कलाकारांसाठी चहा आणण्यापासून तर त्यांच्यासाठी खुर्च्या लावण्यापर्यंतचे पडेल ते काम त्याने केलं. पण 2010 मध्ये आदित्य चोप्राने रणवीरला ब्रेक दिला आणि रणवीरचा पहिलाच चित्रपट ‘बँड बाजा बारात’ सुपरहिट झाला. यानंतर रणवीरने कधीच मागे वळून पाहिलं नाही. याच रणवीरला कधीकाळी रवीना टंडनने सेटवरून हाकलून लावलं होतं. होय, ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये खुद्द रणवीरने हा किस्सा ऐकवला होता.

हा किस्सा आहे 1994 सालचा. रवीना टंडन त्यावेळी ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पानी’ (Tip Tip Barsa Paani) या गाण्याचं शूटींग करत होती. रणवीर या गाण्याच्या सेटवर हजर होता. पण त्यावेळी रणवीर केवळ 11 वर्षांचा होता. रणवीरला सेटवर पाहून रवीनाला काहीसं अवघडल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळे तिने लगेच निर्मात्यांना सांगून रणवीरला सेटवरून बाहेर काढलं.

अक्षय सरांनी माझा मूड ओळखला आणि...
रणवीरनं हा किस्सा मोठ्या रंजकपणे सांगितला होता. तो म्हणाला होता की, रवीना टंडन मॅडम पिवळ्या रंगाची साडी नेसून टिप टिप बरसाचं शूटींग करत होत्या. मी कधीच इतक्या सुंदर मुलीला याआधी पाहिलं नव्हतं. मी एकटक रवीना मॅडमकडे बघत होतो. कदाचित माझ्या या वागण्यामुळे रवीना मॅडमला काहीसं अनकम्फर्टेबल वाटू लागलं असावं आणि त्यांनी मला सेटवरून हाकलून लावलं. मी निराश होऊन सेटवरून बाहेर पडलो होतो. मी त्यावेळी लहान मुलगा होतो. सेटवरून हुसकावून लावल्यामुळे हिरमुसलो होतो. अक्षय सर त्यावेळी सेटवर होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांना कदाचित माझा मूड समजला. पोराला वाईट वाटलंय, असं बघून अक्षय सर माझ्याजवळ आलेत. त्यांनी माझ्या हेअरस्टाईलचं कौतक केलं. अक्षय सरांनी माझ्या हेअरस्टाईलचं कौतुक करताच माझी कळी एकदम खुलली. मी त्यांच्यासोबत एक फोटोही क्लिक केला.

म्हणून मी रणवीरला सेटवरून हाकललं होतं...
रवीनाने असं का केलं, याचा खुलासाही नंतर झाला होता. रवीनाने स्वत: याबद्दल सांगितलं होतं. होय, मी रणवीरला सेटवरून हाकललं होतं. पण यामागचा माझा हेतू निर्मळ होता.  त्यावेळी ‘टीप टीप बरसा पानी’ गाण्याचं शूटींग सुरु होतं आणि हे गाणं प्रचंड सेन्शुअल होतं. रणवीर तेव्हा खूप लहान होता. मुलांनी असं सेन्शुअल गाणं शूट होताना पाहू नये, असं माझं मत होतं. त्यामुळे आईवडिलांना राहू द्या पण लहान मुलांना बाहेर काढा, असं मी निर्मात्यांना सांगितलं होतं. मुलांनी वयाच्या हिशेबाने योग्य तेच पहावं, हे माझं मत आहे आणि आत्ताही मी या मतावर ठाम आहे, असं रवीना म्हणाली होती.
रवीना तिच्या जागी अगदी योग्य होती. पण रणवीर आजही रवीनाला भेटला की, या घटनेचा न चुकता उल्लेख करतो. अर्थात गमतीने.

Web Title: Ranveer Singh Birthday when raveena tandon throw out ranveer singh from the sets of mohra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.