रणदीप हुड्डा कोल्हापुरात! अंबाबाईच्या चरणी झाला नतमस्तक, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:20 IST2026-02-24T14:10:49+5:302026-02-24T14:20:43+5:30
रणदीप हुड्डानं कोल्हापूरातील अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले आहेत.

रणदीप हुड्डा कोल्हापुरात! अंबाबाईच्या चरणी झाला नतमस्तक, फोटो व्हायरल
रणदीप हुड्डा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. रणदीप कमी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. 'सरबजीत' असो वा 'लव्ह आज कल' किंवा 'लाल रंग' आणि 'हायवे', रणदीप हुड्डाने प्रत्येक चित्रपटात अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे. रणदीप सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत तो चाहत्यांना माहिती देत असतो. नुकतंच रणदीप हुड्डानं कोल्हापूरातील अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले आहेत. रणदीप सध्या त्याच्या आगामी प्रकल्पांच्या निमित्ताने कोल्हापुरात आहे.
प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर सिनेमा आधारित आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगांवकर यांची भूमिका साकारत असून श्रद्धासोबत रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. पुण्यातील शुटिंग पुर्ण झाल्यानंतर टीम कोल्हापूरात पोहचली. याचदरम्यान रणदीप कोल्हापूरातील अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचला. यावेळी तो पारंपरिक वेशभूषेत अत्यंत साध्या रूपात दिसला. त्याला पाहण्यासाठी चाहते जमले होते. त्याने आपल्या काही चाहत्यांना अभिवादन केले आणि काही जणांशी संवादही साधला.
कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई) हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पूर्ण पीठ असून ते करवीर निवासिनी म्हणून ओळखले जाते. हे प्राचीन मंदिर देवी सतीचे डोळे पडलेले स्थान मानले जाते. भाविकांचे कुलदैवत असलेल्या या मंदिरात श्री महालक्ष्मी (अंबाबाई) च्या मूर्तीची नित्य पूजा व किरणोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. हे मंदिर शिलाहारकालीन असून याला सुमारे १७०० ते १८०० वर्षांचा इतिहास मानला जातो. करवीर निवासिनी महालक्ष्मी ही कोल्हापूरची कुलस्वामिनी आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देतात.