झुपकेदार मिशा आणि पिळदार शरीरयष्टी! 'ईठा' सिनेमासाठी रणदीप हुडाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:12 IST2026-02-04T13:11:27+5:302026-02-04T13:12:15+5:30
श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ईठा सिनेमासाठी रणदीप हुडा प्रचंड मेहनत घेताना दिसतोय. रणदीपचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन असलेला लूक व्हायरल झाला आहे

झुपकेदार मिशा आणि पिळदार शरीरयष्टी! 'ईठा' सिनेमासाठी रणदीप हुडाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
बॉलिवूडचा 'मेथड अॅक्टर' म्हणून ओळखला जाणारा रणदीप हुडा पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. रणदीप प्रत्येक सिनेमासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसतो. आत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी 'ईठा' या सिनेमासाठी रणदीपने स्वतःच्या शरीरयष्टीत मोठा बदल केला आहे. रणदीपचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
रणदीपचे थक्क करणारे ट्रान्सफॉर्मेशन
आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतणारा रणदीप याही वेळी काही वेगळे करत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासाठी त्याने वजन अत्यंत कमी केले होते, मात्र 'ईठा'साठी त्याने शरीरयष्टी कमावली असून त्याचा भारदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत शूटिंगदरम्यान त्याला या नवीन अवतारात पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रणदीप सिनेमात नक्की कोणती भूमिका साकारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
'ईठा' सिनेमाविषयी
'ईठा' हा चित्रपट महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. विठाबाईंना प्रेमाने 'विठा' म्हटले जायचे, त्यावरूनच चित्रपटाचे नाव 'ईठा' असे ठेवण्यात आले आहे. श्रद्धा कपूर यामध्ये विठाबाईंची मुख्य भूमिका साकारत असून रणदीप हुडा तिच्या पतीची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. अर्थात याविषयी अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.
'ईठा' सिनेमानिमित्ताने श्रद्धा कपूर आणि रणदीप हुडा ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. श्रद्धा या भूमिकेसाठी खास लावणी आणि मराठमोळ्या संस्कृतीचे प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा सांगणारा हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. 'लुका छुपी', 'मिमी' आणि नुकताच गाजलेला 'छावा' फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. आपल्या मातीतील कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले उतेकर आता 'ईठा'च्या माध्यमातून एक भावनिक आणि सांस्कृतिक प्रवास प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.