सेल्युलर जेलमध्ये भावुक झाला रणदीप हुडा, वीर सावरकरांसाठी लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:38 IST2025-12-15T15:37:27+5:302025-12-15T15:38:13+5:30
अभिनेत्यानं गेल्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित "स्वतंत्र वीर सावरकर" हा चित्रपट बनवला होता.

सेल्युलर जेलमध्ये भावुक झाला रणदीप हुडा, वीर सावरकरांसाठी लिहिली खास पोस्ट
रणदीप हुड्डा (randeep hooda) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. रणदीप त्याच्या सिनेमांमुळे आणि वक्तव्यांमुळे चांगलाच चर्चेत असतो. अभिनेत्यानं गेल्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित "स्वतंत्र वीर सावरकर" हा चित्रपट बनवला होता. २० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही, तसेच तो अनेक वादांमध्येही अडकला होता. मात्र, या वादांनंतरही रणदीप हुड्डाला त्यांच्या कामासाठी खास सन्मान मिळाला आहे. वीर सावरकरांनी लिहिलेल्या एका कवितेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अभिनेत्याला पुरस्काराने गौरविण्यात आले.
रणदीप हुड्डानं हा पुरस्कार स्वीकारतानाच्या क्षणाबद्दल सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहिली. त्यानं अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर येथील सेल्युलर जेलचे काही फोटोही शेअर केले. रणदीप हुड्डानं पोस्टमध्ये लिहिले, "सेल्युलर जेलची ११५ वर्षे पूर्ण... 'सागर प्राण तारमाला' या वीर सावरकरांनी लिहिलेल्या कवितेचा हा वर्धापन दिन आहे. ज्या सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकरांनी एकेकाळी त्रास सहन केला होता आणि जिथे मी माझ्या 'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपटाचा मोठा भाग चित्रित केला होता, त्याच जेलला पुन्हा भेट देणे आणि तेथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होताना पाहणे, हा माझ्यासाठी एक अतिशय वैयक्तिक अनुभव आहे. इतिहास कदाचित उशिरा न्याय देतो, पण सत्य कायम टिकून राहते".
या ऐतिहासिक ठिकाणी मिळालेला सन्मान रणदीप हुड्डासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. अभिनेता पुढे म्हणाला, "या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित राहण्याचा मला सन्मान लाभला आणि जे ठिकाण वीर सावरकरांच्या अपार बलिदानाची साक्ष देतं, त्याच ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सन्मान मिळाल्याने मी अत्यंत नम्र आणि कृतज्ञ झालो आहे".
पुढे तो म्हणाला, "पोर्ट ब्लेअरमध्ये इतिहास, बलिदान आणि अनेक वर्षांनंतर मिळालेली मान्यता... या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या असा हा क्षण होता. वीर सावरकरांचा वारसा आज अभिमानाने उभा आहे, ज्या ठिकाणी त्यांनी कधी अकल्पनीय यातना सहन केल्या, तिथेच अखेर त्यांचा सन्मान झाला आहे. वंदे मातरम्" असं त्यानं पोस्टच्या शेवटी म्हटलं.
सावरकरांच्या काळा पाणी शिक्षेचा ऐतिहासिक संदर्भ
१९११ मध्ये ब्रिटीश सरकारने वीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती आणि त्यांना पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर तुरुंगात ठेवले होते. आता त्याच ठिकाणाला श्री विजयपुरम म्हणून ओळखले जाते. तिथेच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हे ठिकाण आजही स्वातंत्र्य चळवळीच्या अमर गाथांचे प्रतीक आहे.