'रामायण'चा ग्रँड सोहळा लांबणीवर; मुंबईत होणारा कार्यक्रम निर्मात्यांनी का पुढे ढकलला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:02 IST2026-03-09T14:01:12+5:302026-03-09T14:02:03+5:30
निर्माते नमित मल्होत्रा यांनी रामनवमीला होणारा मोठा इव्हेंट तूर्तास रद्द केला आहे.

'रामायण'चा ग्रँड सोहळा लांबणीवर; मुंबईत होणारा कार्यक्रम निर्मात्यांनी का पुढे ढकलला?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'रामायण: द इंट्रोडक्शन' सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, रामनवमीच्या मुहूर्तावर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे एक भव्य सोहळा पार पडणार होता. मात्र आता हा कार्यक्रम लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक स्तरावर ईराण आणि ईस्रायलमध्ये सुरू असलेला तणाव हे यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक तणावामुळे निर्मात्यांचा मोठा निर्णय
'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माते नमित मल्होत्रा यांनी रामनवमीला होणारा मोठा इव्हेंट तूर्तास रद्द केला आहे. या सोहळ्यासाठी गेटवे ऑफ इंडियाचे ठिकाण निश्चित झाले होते आणि पाहुण्यांना आमंत्रणेही पाठवण्यात आली होती. या कार्यक्रमात मुख्य पात्रांचे 'लूक' रिव्हील केले जाणार होते. मात्र, 'रामायण' हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प असून निर्मात्यांना तो जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये मोठे प्रमोशन करणे योग्य नसल्याचे टीमचे मत आहे. त्यामुळे घाई न करता योग्य वेळेची वाट पाहण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 'रामायण: द इंट्रोडक्शन' दिवाळी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा तीन मिनिटांचा टीझर रिलीज करण्यात आला होता ज्याला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
तगडी स्टारकास्ट आणि भूमिका
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे. तर 'KGF' फेम यश रावणच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय चित्रपटात सनी देओल, रवी दुबे, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर, मोहित रैना, अरुण गोविल आणि मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे यांसारख्या तगड्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.