टीम इंडियाला चीअर करताना दिसली छोटी राहा कपूर; रणबीर-आलियाने लेकीसोबत पाहिली मॅच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:18 IST2026-03-06T11:17:56+5:302026-03-06T11:18:30+5:30
व्हायरल व्हिडीओमध्ये राहा बाबा रणबीरच्या मांडीवर बसून आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहेत

टीम इंडियाला चीअर करताना दिसली छोटी राहा कपूर; रणबीर-आलियाने लेकीसोबत पाहिली मॅच
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर काल झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० रोमांचकारी सेमीफायनल सामन्यादरम्यान बॉलिवूडचे पॉवर कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपली लेक राहा कपूरसोबत सामना पाहताना दिसले. सोशल मीडियावर या तिघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये राहा बाबा रणबीरच्या मांडीवर बसून आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहेत. तर शेजारी बसलेली आलिया लेकीचे कौतुक करताना हसताना दिसत आहे. तर कधी रणबीर राहाच्या खांद्यावर डोके टेकवून तिच्याशी गप्पा मारताना दिसला, तर आलिया मागे बसलेल्या आकाश अंबानींशी संवाद साधत होती. या तिघांचा एकत्र टाळ्या वाजवतानाचा आणि राहासोबतचा क्युट व्हिडिओ पाहून चाहत्यांनी 'किती गोड कुटुंब' असं म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या सामन्याला केवळ कपूर कुटुंबच नाही, तर वरुण धवन, अनिल कपूर, नीता अंबानी, राधिका मर्चंट, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांसारख्या दिग्गजांनीही हजेरी लावली होती. या सगळ्यात रणबीर, आलिया आणि राहा आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरले. तसंत बऱ्याच महिन्यांनी राहाचा चेहरा कॅमेऱ्यासमोर पुन्हा बघायला मिळाला. यामुळे चाहतेही खूश झाले.
रणबीर-आलियाने एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये राहाचा जन्म झाला. २०२३ च्या ख्रिसममध्ये या जोडीने पहिल्यांदा राहाचा चेहरा दाखवला होता. मात्र, नंतर आलियाने राहाचे सर्व फोटो तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवले होते. काल पुन्हा राहाचा चेहरा दिसल्याने तिच्या क्युटनेसवर सर्व फिदा झाले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर कपूर लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव अँड वॉर' या चित्रपटात आलिया आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय तो नितेश तिवारींच्या बहुचर्चित 'रामायण' चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साई पल्लवी (सीता), सनी देओल (हनुमान) आणि यश (रावण) दिसणार आहेत. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत भेटीला येईल. दुसरीकडे, आलिया भट्ट देखील 'चामुंडा', 'हाऊसवाइफ' आणि वायआरएफ स्पाई युनिव्हर्सच्या 'अल्फा' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.