अयोध्यावासियांना 'कटप्पा' म्हणत अभिनेत्याची उघड नाराजी, म्हणाला - "जनतेने राजाशी गद्दारी केली अन्.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 10:53 IST2024-06-06T10:48:51+5:302024-06-06T10:53:34+5:30
रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने अयोध्येत भाजपाचा पराभव झाल्याबद्दल राग व्यक्त केलाय (bjp, ayodhya, sunil lahri)

अयोध्यावासियांना 'कटप्पा' म्हणत अभिनेत्याची उघड नाराजी, म्हणाला - "जनतेने राजाशी गद्दारी केली अन्.."
लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. निवडणूक निकालांमध्ये देशातील राजकीय पक्षांचं भवितव्य आणि इतरही अनेक चित्र स्पष्ट झाली. या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अयोध्या भागाची. ज्या ठिकाणी भाजपानेराम मंदिराची निर्मिती केली तिथेच भाजपाला पराभव पत्करावा लागला. यामुळे विविध कलाकार अयोध्यावासियांवर राग प्रकट करत आहेत. अशातच 'रामायण' मालिकेतील लक्ष्मण म्हणजेच अभिनेता सुनील लहरी यांनी अयोध्यावासियांवर नाराजी व्यक्त केलीय.
राम आणणाऱ्याला जनतेची साथ नाही: सुनील लहरी
सुनील लहरी यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवावर इन्स्टाग्रामवर एक स्टेटस पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी राम आणणाऱ्याला अयोध्येतील जनतेने साथ दिली नाही यावर नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय 'कटप्पा' आणि बाहुबलीचं उदाहरण दिलंय. सुनील लहरी यांनी लिहिलंय की, "अयोध्यावासी जनतेला आदरपूर्वक नमस्कार. तुम्ही सीतामातेला सोडलं नाही तर ज्या माणसाने रामाला टेंटमधून बाहेर काढून भव्य मंदिरात आणले त्याचा विश्वासघात करणं ही तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. संपूर्ण भारत तुम्हाला कधीही चांगल्या नजरेने पाहणार नाही."
जनतेने खऱ्या राजाशी गद्दारी केली: सुनील लहरी
यानंतर सुनील लहरींनी आणखी काही पोस्ट केल्यात. ज्यात ते लिहितात, "आम्ही विसरलो आहोत की अयोध्येतील हेच लोक आहेत ज्यांनी वनवासातून आल्यानंतर सीता मातेवर संशय घेतला होता. हिंदू असा समुदाय आहे जो देव जरी त्यांच्यासमोर आला तर त्यालाही नाकारतील, स्वार्थी. इतिहास साक्षी आहे की, अयोध्येतील जनतेने आपल्या खऱ्या राजाशी गद्दारी केली आहे. धिक्कार आहे या गोष्टीचा" अशाप्रकारे अयोध्येत भाजपा हरल्यावर सुनील लहरी यांनी अयोध्या नगरवासियांवर नाराजी प्रकट केलीय.