प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांवर संतापली रकुल प्रीत सिंग; म्हणाली- "वेट लॉस नावाचीही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:19 IST2025-12-16T18:17:50+5:302025-12-16T18:19:23+5:30
Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंगने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या सर्व चर्चांना फेटाळून लावले आहेत. फिटनेस, डाएट आणि मेहनतीमुळेही लूकमध्ये बदल होतो, असे अभिनेत्रीने सोशल मीडियावर ठणकावून सांगितले आहे.

प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांवर संतापली रकुल प्रीत सिंग; म्हणाली- "वेट लॉस नावाचीही..."
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या सोशल मीडियावर एका नव्या वादामुळे चर्चेत आहे. प्लास्टिक सर्जरीबाबत एका व्यक्तीने केलेल्या दाव्यावर गप्प न बसता रकुलने समोर येऊन सडेतोड उत्तर दिले आहे. रकुलच्या काही फोटोंचा वापर करून स्वतःला डॉक्टर आणि प्लास्टिक सर्जन म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने असा दावा केला होता की, रकुलने प्लास्टिक सर्जरी केली आहे. ही पोस्ट व्हायरल होताच रकुलने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
रकुलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत म्हटले की, कोणत्याही पुराव्याशिवाय असे दावे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. जे लोक स्वतःला प्रोफेशनल म्हणवून घेतात आणि तरीही अशा प्रकारचे अंदाज लावतात, त्यांच्यापासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. केवळ कोणाच्या चेहऱ्यात किंवा शरीरात बदल झाला म्हणून त्याने सर्जरीच केली असेल, असे मानणे ही चुकीची विचारसरणी असल्याचे तिने नमूद केले. रकुल पुढे म्हणाली की, "जर एखाद्या व्यक्तीने कॉस्मेटिक प्रोसीजर केली तरी ती त्याची स्वतःची निवड असते. परंतु एखाद्याबद्दल खोट्या अफवा पसरवणे आणि सायन्सच्या नावाखाली ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. अशा गोष्टींमुळे लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचते आणि त्यांची दिशाभूल होते."
फिटनेस आणि डाएटचे महत्त्व
आपल्या लूकबद्दल स्पष्टीकरण देताना रकुलने सांगितले की, तिच्या शरीरात जो बदल दिसत आहे, तो नियमित वर्कआउट, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीमुळे आहे. फिटनेसवर सातत्याने मेहनत घेतल्याने व्यक्तीमध्ये मोठा बदल होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येक वेळी सर्जरीची गरज नसते. सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, असे आवाहनही तिने आपल्या चाहत्यांना केले.
वर्कफ्रंट
रकुल प्रीत सिंगच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरच एका चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ती अलीकडेच 'दे दे प्यार दे २' मध्ये अजय देवगणच्या अपोझिट मुख्य भूमिकेत दिसली होती.