राजपाल यादववरील संकटाची प्रेमानंद महाराजांना आधीच लागली होती चाहूल? 'ती' भेट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:29 IST2026-02-12T15:29:22+5:302026-02-12T15:29:56+5:30
राजपाल संकटात सापडणार हे प्रेमानंद महाराजांना ठाऊक होतं? पाहा व्हायरल व्हिडीओ

राजपाल यादववरील संकटाची प्रेमानंद महाराजांना आधीच लागली होती चाहूल? 'ती' भेट चर्चेत
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव सध्या एका कठीण आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतर राजपाल यादवला तिहार तुरुंगात शरण जावे लागले. . या सगळ्या घडामोडींमध्ये आता त्यांचा दोन महिन्यांपूर्वीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.
तुरुंगात जाण्यापूर्वी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी (डिसेंबर २०२५ मध्ये) राजपाल यादव नंवृंदावन येथे प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले होते. त्या भेटीतील संवादाचा व्हिडीओ 'भजनमार्ग' या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराज राजपालला विचारतात, "ठीक आहेस?" त्यावर राजपाल म्हणतो, "आज ठीक आहे" यानंतर महाराज म्हणतात, "तुम्ही सर्व भारतीयांना हसवता, त्यांचं मनोरंजन करता, हे चांगलं आहे".
संवादादरम्यान प्रेमानंद महाराजांनी जीवनातील संकटांबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले होते. ते म्हणाले होते, "आयुष्यात कधी संकटे येतात, तर कधी दुःख. कधी प्रियजनांपासून ताटातूट होते, तर कधी आर्थिक समस्या उभ्या राहतात. अशा कठीण प्रसंगात तुझी काळजी घेणारा फक्त देवच असतो. जोपर्यंत तुम्ही चांगले आहात, खाऊन-पिऊन सुखी आहात, तोपर्यंत लोक हात मिळवतील. पण उद्या संकटात अडकलात, तर हेच लोक तुम्हाला दुरून पाहून रस्ता बदलतील, जेणेकरून तुम्हाला त्यांच्याशी बोलावं लागू नये".
महाराजांचे शब्द ऐकून राजपाल भारावून गेला होता. "तुम्हाला पाहून देव अस्तित्वात आहे हे सिद्ध झालं, आता मला काहीच सुचत नाहीये" असे तो म्हणाला होता. हा व्हिडीओ पाहून 'भजन मार्ग' यूट्यूब चॅनेलवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेमानंद महाराजांनी राजपाल यांना दिलेल्या उपदेशात त्यांच्यावर येणाऱ्या संकटाचे संकेत दिले होते, असे काही चाहते म्हणत आहेत. एका युजरने लिहिले, "महाराजांना माहित होतं की राजपालवर संकट येणार आहे, म्हणून त्यांनी इतक्या प्रेमाने सावध केलं होतं". दुसऱ्या एकाने लिहिले, "आज राजपाल खरोखरच एकटे पडले आहेत, महाराजांचे शब्द किती खरे ठरले!".