राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने 'बधाई दो'च्या शूटिंगला केली सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 21:02 IST2021-01-05T21:01:50+5:302021-01-05T21:02:32+5:30
भूमी पेडणेकर आणि राजकुमार रावने आगामी चित्रपट 'बधाई दो'च्या शूटिंगला मंगळवारी सुरूवात केली आहे.

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने 'बधाई दो'च्या शूटिंगला केली सुरूवात
भूमी पेडणेकर आणि राजकुमार रावने आगामी चित्रपट बधाई दोच्या शूटिंगला मंगळवारी सुरूवात केली आहे. याबद्दल त्या दोघांनी सोशल मीडियावर सांगितले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर २०२०मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. बधाई दो एक फॅमिली कॉमेडी चित्रपट आहे.
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाच्या सेटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव या दोघांनी हातात क्लॅपबोर्ड पकडलेला दिसतो आहे. दुसऱ्या फोटोत दोघे दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णीसोबत दिसत आहेत. दोघांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, सुरू झाली आमची कहाणी, जिथे आहेत दोघे राजा आणि राणी, शार्दुल आणि सुमी आहेत एकमेकांच्या प्रेमात, ते दोघे सिच्युएशनमुळे सापडलेत अडचणीत, भेटणार लवकरच तुम्हाला, तेव्हा होईल सगळे स्पष्ट आणि तेव्हा आम्ही म्हणू बधाई दो.
बधाई दो चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झालेला चित्रपट बधाई होचा सीक्वल आहे. चित्रपटात आयुषमान खुराना, गजराज राव, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता आणि सुरेखा सीकरीने मुख्य भूमिका साकारली होती.
बधाई दो चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली होत आहेत. जंगली पिक्चर्सने आतापर्यंत 'तलवार', 'बरेली की बर्फी', 'राजी', 'बधाई हो' यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. बधाई होचे दिग्दर्शन रवींद्रनाथ शर्माने केले होते.
भूमी पेडणेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती दुर्गामती चित्रपटात झळकली. या चित्रपटाला हवा तितका चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही.दुर्गावती चित्रपट भागमती चित्रपटाचा रिमेक आहे. भागमतीमध्ये मुख्य भूमिकेत अनुष्का शेट्टी होती. चित्रपटाची कथा हॉरर व सस्पेन्सने परिपूर्ण होती.
तर राजकुमार राव शेवटचा ल्युडो आणि छलांग या चित्रपटात दिसला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २०२१मध्ये राजकुमारने एकाच वेळी तीन सिनेमे साइन केले आहेत. या चित्रपटांबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही.