राजेश खन्ना यांनादेखील एकेकाळी 'बिग बॉस'ची मिळाली होती ऑफर, प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार होती मोठी रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 18:49 IST2024-08-16T18:48:53+5:302024-08-16T18:49:18+5:30
Rajesh Khanna : राजेश खन्ना यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते. एकेकाळी या अभिनेत्याला बिग बॉस शोची ऑफर आल्याचे सांगितले जाते.

राजेश खन्ना यांनादेखील एकेकाळी 'बिग बॉस'ची मिळाली होती ऑफर, प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार होती मोठी रक्कम
राजेश खन्ना ( Rajesh Khanna ) यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते. त्यांचे स्टारडम जबरदस्त होते आणि त्यांच्या निधनानंतरही आजही त्यांची आठवण काढली जाते. त्यांच्या नंतरच्या काळात, जेव्हा राजेश खन्ना यांच्याकडे चित्रपटांमध्ये फारसे काम नव्हते, तेव्हा त्यांना 'बिग बॉस'ची ऑफरही आली होती. टेलिव्हिजन शोच्या निर्मात्यांनी त्यांना प्रत्येक भागासाठी मोठ्या रकमेची ऑफर दिली होती परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली होती.
खरेतर ही माहिती ज्येष्ठ पत्रकार अली पीटर जॉन यांनी दिली, ज्यांचे आता निधन झाले आहे. रेडिफने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा अली पीटर जॉन यांनी हे सांगितले होते. ते म्हणाले होते की, "एकदा बिग बॉसच्या निर्मात्यांनी मला त्यांच्याशी (राजेश खन्ना) मीटिंग फिक्स करण्यासाठी बोलावले होते, त्यांना ते बिग बॉसच्या घरात हवे होते. पण ते म्हणाले होते की, "नाही, नाही, राजेश खन्ना असा शो थोडी करतील. " पीटर जॉन यांनी असेही सांगितले होते की निर्माते राजेश खन्ना यांना प्रत्येक एपिसोडसाठी ३.५ कोटी रुपये फी देण्यास तयार होते पण हे घडू शकले नाही.
ऑफर स्वीकारणार होते पण...
राजेश खन्ना यांची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांनी शो न करण्याचा हट्ट सोडला नसल्याचेही त्यांनी नमूद केले. खूप नंतर, राजेश खन्ना यांनी आपला विचार बदलला आणि ऑफर स्वीकारण्याचा निर्णय घेतला, परंतु तोपर्यंत, चॅनेलला त्यांना शोमध्ये कास्ट करण्यात रस नव्हता.
राजेश खन्ना यांचे २०१२ मध्ये झाले निधन
अली यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत सुपरस्टारसोबत झालेली भेटही आठवली. ते म्हणाले की, खन्ना यांना त्यांच्या मृत्यूच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो. या महान अभिनेत्याने अली पीटर जॉन यांना सांगितले होते, "जर गालिब दारू पिऊन मरू शकतो, तर मी का नाही?" १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांचे निधन झाले. जुलै २०११ मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यापासून त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहअभिनेत्री मुमताजने ही बाब उघड केली.