"तो तर माझा मित्रही नाही...", तुषार कपूरसोबत जोडलं गेलेलं नाव, राधिका आपटेची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:20 IST2025-12-26T16:19:34+5:302025-12-26T16:20:40+5:30
'त्या' कारणामुळे सुरु झाल्या चर्चा, राधिकाने केला खुलासा

"तो तर माझा मित्रही नाही...", तुषार कपूरसोबत जोडलं गेलेलं नाव, राधिका आपटेची प्रतिक्रिया
मराठी, हिंदी सोबतच हॉलिवूडमध्येही दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सध्या चर्चेत आहे. तिचे पाठोपाठ दोन सिनेमे रिलीज झाले आहेत. 'साली मोहोब्बत'आणि 'रात अकेली है' या सिनेमांमध्ये ती दिसत आहे. राधिकाने व्हायोलिनिस्ट बेनेडिक्ट टेलरसोबत काही वर्षांपूर्वीच लग्न केलं. गेल्या वर्षी राधिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान करिअरच्या सुरुवातीला राधिकाचं नाव तुषार कपूरसोबत जोडलं गेलं होतं. त्यावर आता तिने इतक्या वर्षांनी प्रतिक्रिया दिली.
'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत राधिका आपटेला तिच्याबद्दल ऐकलेली सर्वात विचित्र अफवा कोणती असं विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, "मी तुषार कपूरला डेट करतीये...खूप जुनी अफवा आहे. तेव्हा मी लंडनमध्ये डान्स शिकत होते. पेपरमध्ये आर्टिकल आले की मी तुषार कपूरसोबत व्हॅलेंटाईन डेसाठी गोव्याला गेले आहे. तिथे लंडनमध्ये माझे खाण्याचेही वांदे होते. मी विद्यार्थिनी होते. माझ्याकडे पैसे नसायचे आणि मी तुषारसोबत गोव्याला? मी आणि रुममेट बसून ते आर्टिकल वाचत होतो, त्यावर हसत होतो. माझ्याकडे तर तुषारचा फोन नंबरही नाही मग मी गोव्याला कसं जाईन? तो माझा मित्रही नाही त्यामुळे मी कुठून या अफवा क्लिअर करु..."
ती पुढे म्हणाली, "तुषारसोबत मी 'शोर इन द सिटी'मध्ये काम केलं होतं. पण फक्त तीन-चार दिवसांचंच आमचं एकत्र काम होतं. नंतर आमचा काहीच संपर्क नव्हता. मग मला समजलं की ही त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. हे असं करतात हे मला माहितच नव्हतं."
राधिका गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. तिने 'अंधाधून', 'हंटर', 'सिस्टर मिडनाईट', 'लस्ट स्टोरीज', 'पॅडमॅन', 'कबाली', 'मांझी' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या ती पती आणि मुलीसोबत लंडनमध्येच स्थायिक आहे. केवळ कामासाठी ती भारतात येते.