राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:41 IST2026-01-14T12:39:52+5:302026-01-14T12:41:06+5:30
मुलीला न पाहता आठवडाभर काम करत राहायची तुम्ही कशी काय अपेक्षा करु शकता?

राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
अभिनेत्री राधिका आपटे ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतीच आई झालेल्या राधिकाने आता चित्रपटसृष्टीतील कामाच्या कठीण अटी आणि जास्त तासांच्या शिफ्टविरोधात आवाज उठवला आहे. निर्मात्यांसोबत झालेल्या एका वादाचा खुलासा करताना तिने कामाच्या ठिकाणी असलेल्या 'वर्क कल्चर'वर कडक शब्दांत टीका केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
राधिका आपटेने नुकतीच फिल्मफेअरला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, " आई झाल्यानंतर पुन्हा काम सुरु करताना तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. १२ तासांची शिफ्ट असावी ही तिची पहिली अट होती. दुसरी अट म्हणजे जर कलाकार आणि इतर क्रू १२ तास सलग काम करत असतील, तर त्यांना आठवड्यातून किमान एक दिवस सुट्टी मिळावी."
मात्र राधिकाच्या या अटी निर्मात्यांनी मान्य केल्या नाहीत. अनेक निर्मात्यांनी विरोध केला. त्यांच्या मते, अशा अटींमुळे कामाचे वेळापत्रक बिघडते आणि खर्च वाढतो. यावर राधिका पुढे म्हणाली, "जर तुम्ही माणसाच्या हक्कांचा आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करणार नसाल तर मी अशा ठिकाणी काम करू शकत नाही."
राधिकाने सांगितला मातृत्वाचा अनुभव
राधिका म्हणाली,"बाळ झाल्यानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या वाढतात. अशा वेळी १२-१२ तास काम करून पुन्हा घराकडे लक्ष देणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारे असते. अनेकांनी मला लेकीसाठी नॅनी ठेवायला सांगितलं. पण हा काही पर्याय नाही. मुलीला न पाहता आठवडाभर काम करत राहायची तुम्ही कशी काय अपेक्षा करु शकता? आम्ही मशीन नाही, आम्हालाही विश्रांतीची गरज आहे. म्हणूनच मी जास्त शिफ्ट्समध्ये काम करायला नकार दिला. यासाठी मला खूप लढावं लागलं." असं ती ठामपणे म्हणाली.
चित्रपटसृष्टीतील 'टॉक्सिक' वर्क कल्चरवर प्रहार
तिने पुढे नमूद केले की, चित्रपटसृष्टीत अनेकदा सलग अनेक दिवस सुट्टीशिवाय काम करून घेतले जाते. हे थांबायला हवे आणि कामाचे तास निश्चित असायला हवेत, यासाठी ती सध्या निर्मात्यांशी लढा देत आहे.