आर. माधवनला 'धुरंधर'मधील लूकमध्ये तयार होण्यासाठी लागायचे ४ तास, सेटवर ओळखू शकला नव्हता अर्जुन रामपाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:19 IST2025-11-19T10:18:11+5:302025-11-19T10:19:16+5:30
R. Madhavan Dhurandhar movie look : अभिनेता आर माधवन आगामी काळात 'धुरंधर' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. 'धुरंधर'मधील माधवनचा लूक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

आर. माधवनला 'धुरंधर'मधील लूकमध्ये तयार होण्यासाठी लागायचे ४ तास, सेटवर ओळखू शकला नव्हता अर्जुन रामपाल
अभिनेता रणवीर सिंगचा आगामी 'धुरंधर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. मुंबईत झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात 'धुरंधर'चे कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित होते. ज्यात आर माधवन आणि अर्जुन रामपालसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी अर्जुन रामपालने खुलासा केला होता की, चित्रपटाच्या सेटवर आर माधवनचा लूक पाहून त्याला ओळखता आले नाही.
अभिनेता अर्जुन रामपाल गेल्या काही दिवसांपासून खलनायकाच्या भूमिकांमध्ये दिसत आहे. त्यानंतर 'धुरंधर' चित्रपटातही तो नकारात्मक भूमिकेत असेल. त्याच्यासोबत आर माधवन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अर्जुन म्हणाला की, ''मी पहिल्यांदाच आर माधवनसोबत काम करत आहे. दुर्दैवाने, चित्रपटात आमचे एकही दृश्य एकत्र नाही, पण मला आठवते की मी पहिल्यांदा थायलंडमध्ये 'धुरंधर'च्या सेटवर पोहोचलो होतो. तिथे मॅडी (माधवन) शूटिंग करत होता. मी म्हणालो की हा अभिनेता कोण आहे? आपल्या ओळी चांगल्या प्रकारे बोलत आहे. खरंतर, मी त्याला ओळखूच शकलो नाही. तो चित्रपटात शानदार दिसत आहे.'' आर माधवनने सांगितले की, ''त्याला त्याच्या भूमिकेच्या लूकमध्ये येण्यासाठी तीन ते चार तास लागायचे.''
'धुरंधर'वर रणवीर सिंगचे मत
मंगळवारी मुंबईत मोठ्या संख्येने चाहते आणि माध्यमांच्या उपस्थितीत अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी रणवीर सिंगने सांगितले की, ''हा चित्रपट एका गुंतागुंतीच्या आणि अनेक पदर असलेल्या कथेवर आधारित आहे, जी अत्यंत तांत्रिक कौशल्याने सादर केली गेली आहे. हे पाहून तुम्ही चकित व्हाल.''
तो म्हणाला, ''आदित्य धरने जेव्हा मला कथा सांगितली तेव्हा मी अवाक् झालो होतो. मी म्हणालो की असंही होतं? त्याने सांगितले की, हो बेटा, असंही होतं. ही एक अविश्वसनीय खरी कहाणी आहे. आता जागतिक स्तरावर भारताची वेळ आहे आणि आम्हाला याच्या केंद्रस्थानी राहायचे आहे. आम्हाला भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर सादर करायचे आहे.'' 'धुरंधर' ५ डिसेंबर २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.