भूमी पेडणेकर व आयुषमान खुराना पुन्हा झळकणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:14 IST2019-04-08T20:14:15+5:302019-04-08T20:14:41+5:30
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी 'दम लगा के हईशा' चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली.

भूमी पेडणेकर व आयुषमान खुराना पुन्हा झळकणार एकत्र
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी 'दम लगा के हईशा' चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ते दोघे अमर कौशिक यांच्या 'बाला' चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयुषमान खुराना 'बाला' चित्रपटात एका टक्कल पडलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'स्त्री' फेम अमर कौशिक करणार आहेत आणि हा चित्रपट टकलेपणावर आधारीत आहे. आयुषमान खुराना नेहमीच वेगळे व हटके भूमिकेची निवड करतो. त्याचा पहिला चित्रपट विकी डोनरला देखील प्रेक्षकांची खूप दाद मिळाली होती. त्यानंतर आयुषमानच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या तो ड्रीम गर्ल चित्रपटात व्यग्र आहे.
आयुषमानसोबत 'बाला' चित्रपटात काम करण्याबाबत भूमी पेडणेकर म्हणाली की, 'अमर, आयुषमान व माझी विचार करण्याची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे आम्ही तिघे मिळून जे काही करू ते चांगलेच असेल. अमरला काय हवे हे माहित आहे. त्यामुळे तो त्याच्या चित्रपटातील पात्र वास्तविक वाटण्यासाठी खूप मेहनत घेतो.'
भूमी पेडणेकरने 'दम लगा के हईशा' या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
तिने 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'शुभ मंगल सावधान' यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. भूमी आता करण जोहरच्या 'तख्त' या चित्रपटात झळकणार आहे.