प्रमोशनल स्ट्रेटेजीचा बादशाह..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 19:56 IST2016-12-21T19:32:22+5:302016-12-21T19:56:18+5:30

चित्रपटातच नव्हे तर प्रमोशनसाठीही हटके फंडे वापरणारा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान चित्रपटाच्या रिलिजपूर्वीच चित्रपटाला सुपरडूपर हिटचा दर्जा मिळवून देतो. ...

Promotional Strategy King ..! | प्रमोशनल स्ट्रेटेजीचा बादशाह..!

प्रमोशनल स्ट्रेटेजीचा बादशाह..!

त्रपटातच नव्हे तर प्रमोशनसाठीही हटके फंडे वापरणारा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान चित्रपटाच्या रिलिजपूर्वीच चित्रपटाला सुपरडूपर हिटचा दर्जा मिळवून देतो. आतापर्यंतच्या त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनमधून त्याने हे दाखवून दिले आहे. कारण प्रमोशनल स्ट्रेटेजीचा जबरदस्त वापर करीत तो प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाण्यास भाग पाडतो. सध्या त्याच्या ‘दंगल’साठी तो अशाच काही स्ट्रेटेजी वापरत आहे. 



यासाठी तो ‘फॅट टू फिट’चे जबरदस्त कॅम्पेन करीत आहे. आपल्या भरभक्कम शरीराला कशा पद्धतीने तो फिट करतो याचा एक व्हिडीओच सध्या व्हायरल झाला असून, लोक त्याकडे आकर्षित होत आहे. त्याचबरोबर तो लोकांमध्ये अचानक एंट्री करण्यासही चांगलाच माहीर आहे. याच पिक्चरसाठी तो नुकताच हरियाणाच्या छोट्या शहरांच्या चौपाटीवर मोडकी-तोडकी हरयाणवी बोलताना बघावयास मिळाला. तसेच तो आमीर भिवानीच्या एका मध्यमवर्गीय परिवाराच्या विवाहास वधू पक्षाच्या वतीने सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. या दोन्ही ठिकाणी त्याने अचानक एंट्री केली होती, त्यामुळे उपस्थित लोकांची बोलती बंद झाली नसेल तरच नवल. 



१९ डिसेंबर २०१४ ला रिलिज झालेल्या ‘पीके’ला प्रमोट करण्यासाठीही त्याने असेच काहीसे फंडे वापरले होते. यासाठी त्याने भोजपुरी भाषा शिकली होती. चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज करण्यासोबतच आमीर एका मोशन पोस्टरमध्ये भोजपुरी बोलताना दिसत होता. लोकांमध्ये याबाबतची उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून आमीरने भोजपुरीमध्ये आपल्या ट्विटर अकाउंटवर मेसेजेस शेअर केले होते. तसेच त्याने थिएटर्समध्ये स्वत:चे पुतळेही उभे केले होते. जेव्हा प्रेक्षक या पुतळ्यांजवळ जात असत, तेव्हा पुतळ्यामधून आमीर भोजपुरी भाषेत प्रेक्षकांशी संवाद साधत असे. या पुतळ्यांमध्ये आमीरच्या आवाजाचे रेकॉर्डिंग ठेवण्यात आले होते. आमीरचा हा प्रमोशन फंडा प्रेक्षकांना भलताच आवडला होता. कारण या पुतळ्यांची त्यावेळेस जबरदस्त चर्चा रंगली होती. 



धूम-३ च्या वेळेस ऐन प्रमोशनप्रसंगी आमीर गायब असल्याचे सांगितले गेले. यशराज फिल्म्स आणि त्याच्यात बिनसले असल्याची बातमी माध्यमांमध्ये पसरविण्यात आली; मात्र जेव्हा प्रमोशनच्या तिसºया राउंडमध्ये आमीर थेट लोकांमध्ये जाऊन पोहोचला तेव्हा त्याची हजेरी माध्यमांमध्ये हॉट न्यूज बनली. यशराज फिल्म आणि त्याच्यात पॅचअप झाल्याच्या बातम्या रंगून दाखविण्यात आल्या. याचा फायदा चित्रपटालाही झाला. अखेरपर्यंत हा चित्रपट दोघांमधील वादावरून चर्चेत राहिला. खरं तर हे आमीरचे प्रमोशन प्लॅनिंग असल्याचे नंतर उघड झाले. 



‘पीपली लाइव्ह’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील आमीरने असेच काहीसे फंडे वापरले होते. त्यावेळेस त्याने महागाईचा सामना करीत असलेल्या जनतेसमोर चित्रपटातील ‘महंगाई डायन खायत जात है’ हे गीत गायलेल्या गायकाला लोकांमध्ये नेवून लाइव्ह परफॉर्म करायला लावला होता. मॉल्स तसेच मार्केटमध्ये गायकाचा लाइव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी लोकांनी अक्षरश: गर्दी केली होती. यावेळेस आमीरने स्वत: ड्रम वाजवून लोकांचे मनोरंजन केले होते. 



‘गजनी’साठी तर आमीरचा प्रमोशन फंडा कौतुकास्पदच होता. चित्रपटातील आपला गजनी लूक प्रेक्षकांच्या मनावर बिंबावा यासाठी त्याने चक्क रस्त्यावरील सलूनमध्ये जाऊन गजनी हेअरस्टाइल कट करून दाखविला होता. आमीरला सलूनमध्ये बघून माध्यमे तसेच लोकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. तसेच त्याच्या अंगावरील टॅटूही या प्रमोशनसाठी चर्चेत राहिले. 



थ्री इडियट्स या चित्रपटातील प्रमोशन फंडा त्याच्यातील व्यावसायिक दृष्टिकोन अधोरेखित करणारा होता. कारण यावेळी तो बहुरूप धारण करून आॅटो रिक्षांमध्ये फिरताना बघावयास मिळाला. तर कधी गावातील शाळांमध्ये अचानक हातात चहाची किटली घेऊन वर्गात पोहोचला. आमीर देशातल्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या गेटअपमध्ये प्रमोशनसाठी फिरत होता. त्याचा गेटअप असा काही होता की, त्याला ओळखणे कोणालाही अवघड जात होते. 



‘मंगल पांडे’ या चित्रपटाचा प्रमोशन फंडा तर भलताच होता. जेव्हा या चित्रपटासाठी तो माध्यम प्रतिनिधींना इंटरव्ह्यू देत होता, तेव्हा तो पत्रकारांना त्याची मूॅँछ ओढायला सांगत होता. कारण त्यांना कळून चुकावे की त्याची मूॅँछ खरी आहे की खोटी. आमीरची हे अ‍ॅट्रॅक्टिव्ह मार्केटिंग माध्यमांमध्ये खूपच चर्चिले गेले. 



‘तलाश’साठीदेखील त्याने अशाच पद्धतीने मार्केटिंग केले. तो यासाठी मुंबईमधील काही क्राइम रिपोर्टरला भेटला. पुढे त्याने क्राइम रिर्पोर्टिंग करताना त्या पत्रकारांना येत असलेल्या अडचणी लोकांसमोर मांडल्या. 



‘लगान’साठी तर तो चित्रपटातील सर्व फौजफाटा घेऊन लोकांमध्ये फिरत होता. यावेळी त्याचा गेटअप चित्रपटातील गेटअपप्रमाणे असल्याने लोक लगान टीमला बघण्यासाठी तुफान गर्दी करीत होते. या टीमने मॉल्स तसेच सार्वजनिक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. विशेष म्हणजे या टीमने सार्वजनिक ठिकाणी क्रिकेटचे सामनेही भरविले. हे बघून पब्लिक त्यांच्याकडे आकर्षित झाली नसेल तरच नवल. एवढ्यावरच आमीर थांबला नाही. त्याने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाºया सचिन तेंडूलकरला चित्रपट बघण्यासाठी खास आमंत्रित केले होते. 
खरं तर बॉलिवूडमध्ये चित्रपटाचे प्रमोशन हा चित्रपट निर्मितीच्याच खर्चाचा एक भाग असतो; मात्र आमीर याच्या विपरीत विचार करून प्रमोशनचे फंडे वापरतो. त्याच्या मते, थेट लोकांमध्ये जाऊन केलेले प्रमोशन कधीही उत्तम असते. यामुळे प्रमोशनचा खर्चही वाचतो. 
एका मुलाखतीत आमीरच्या मार्केटिंग एजन्सी ‘स्पाइस’च्या प्रमुख शिल्पा हांडा यांनी सांगितले होते की, आमीरच त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनल स्ट्रेटेजी मांडत असतो. कधी-कधी आम्ही आमच्या आयडिया त्याच्याशी शेअर करीत असतो. परंतु तो त्याच्या पद्धतीनेच प्रमोशन प्लॅन तयार करतो. दंगलसाठीचा प्रमोशन प्लॅनही त्यानेच आखला आहे. 

Web Title: Promotional Strategy King ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.