मोलकरणीच्या मुलीसाठी प्रियांका चोप्राने घेतला 'हा' मोठा निर्णय; चिमुरडीचं बदलून टाकलं संपूर्ण आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:44 IST2026-02-10T14:38:15+5:302026-02-10T15:44:55+5:30
'देसी गर्ल' केवळ पडद्यावरच नायिका नाही, तर खऱ्या आयुष्यातही ती सामाजिक भान जपणारी व्यक्ती आहे.

मोलकरणीच्या मुलीसाठी प्रियांका चोप्राने घेतला 'हा' मोठा निर्णय; चिमुरडीचं बदलून टाकलं संपूर्ण आयुष्य
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी ग्लोबल स्टार म्हणजे प्रियंका चोप्रा. 'देसी गर्ल' केवळ पडद्यावरच नायिका नाही, तर खऱ्या आयुष्यातही ती सामाजिक भान जपणारी व्यक्ती आहे. आपल्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीच्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून प्रियांकाने जो निर्णय घेतला, त्याचा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या प्रियंका चोप्राचा जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रियंका सांगते की तिच्या घरी काम करणाऱ्या बाईची ८-९ वर्षांची मुलगी होती, जिला वाचनाची प्रचंड आवड होती. मात्र, एके दिवशी ती मुलगी शाळेत जात नसल्याचे प्रियंकाच्या लक्षात आले. तिने जेव्हा याबद्दल विचारणा केली. तर त्या घरकाम करणाऱ्या बाईने सांगितलं की, "आम्ही एकाच वेळी मुलगा आणि मुलगी अशा दोघांच्या शिक्षणाचा खर्च पेलू शकत नाही, म्हणून आम्ही मुलाला शाळेत पाठवायचे ठरवले असून मुलीची शाळा बंद केली आहे".
हे ऐकल्यानंतर प्रियंकाने तातडीने त्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. प्रियंका म्हणाली, "शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. केवळ पैशांअभावी एखाद्या मुलीचे स्वप्न भंगू नये, म्हणून मी तिला शिकवण्याचा निर्णय घेतला". मिस वर्ल्डचा किताब पटकावलेली प्रियंका युनिसेफची (UNICEF) सदिच्छा दूत म्हणूनही जगभरातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.
'वाराणसी'तून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
प्रियंका चोप्रा लवकरच एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू सोबत स्क्रीन शेअर करणार असून सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे.