"प्रियंकाला मिळालेल्या यशामुळे भावाचं मात्र नुकसान झालं...", आई मधु चोप्रा यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:30 IST2026-01-20T12:30:04+5:302026-01-20T12:30:54+5:30
प्रियंका चोप्राची आई असं का म्हणाली?

"प्रियंकाला मिळालेल्या यशामुळे भावाचं मात्र नुकसान झालं...", आई मधु चोप्रा यांनी व्यक्त केली खंत
प्रियंका चोप्रा आज ग्लोबल स्टार आहे. साउथ, बॉलिवूडमध्ये करिअर केल्यानंतर आज ती हॉलिवूडमध्येही डंका गाजवत आहे. यासोबतच ती मध्येच भारतातही येऊन काम करते. करिअरच्या सुरुवातीला तिला वर्णभेदाचाही सामना करावा लागला होता. पण आज ती आघाडीची अभिनेत्री आहे. प्रियंकाच्या २५ वर्षांच्या करिअरमध्ये तिला तिची आई मधु चोप्रा यांची कायम खंबीर साथ मिळाली. मात्र प्रियंकाच्या यशात तिचा भाऊ मात्र मागे पडला याची खंत नुकतीच मधु चोप्रा यांनी बोलून दाखवली.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मधु चोप्रा म्हणाल्या, "प्रियंकाला जितकं यश मिळालं त्याची किंमत तिच्या भावाला सिद्धार्थला मोजावी लागली. यांचे वडील अशोक चोप्रा कामात असायचे. मी प्रियंकासोबतच होते. तेव्हा सिद्धार्थ लहान होता. त्याच्याकडे फारसं लक्षच देणं झालं नाही. मला वाटतं हे माझ्यासाठीही नुकसानीचंच होतं. मला याची कायम खंत वाटते. जेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा विचार करते तेव्हा लक्षात येतं की अशा काही गोष्टी असतात ज्याला तुम्हाला सामोरं जावंच लागतं."
प्रियंका फक्त १८ वर्षांची होती जेव्हा तिने ग्लॅमर इंडस्ट्रीत प्रवेश केला.२००० साली तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. २ वर्षांनंतर तिला पहिला तमिळ सिनेमा मिळाला. यानंतर 'द हिरो' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. आता ती राजमौलींच्या 'वाराणसी' सिनेमात दिसणार आहे.