'द ब्लफ'मधील प्रियंका चोप्राचा दमदार लूक समोर, 'या' तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:56 IST2026-01-08T14:55:03+5:302026-01-08T14:56:08+5:30
बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'चा हॉलिवूडमध्येही डंका! 'द ब्लफ'मधील 'ब्लडी मेरी' लूक व्हायरल; निक जोनासनेही केलं कौतुक

'द ब्लफ'मधील प्रियंका चोप्राचा दमदार लूक समोर, 'या' तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित
Priyanka Chopra First Look The Bluff : प्रियंका चोप्राला बॉलिवूडची 'देसी गर्ल' म्हणून ओळखलं जातं. तिचा अभिनय, दिलखेचक अदा, सुंदर आवाज या सगळ्या गोष्टी चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतात. आजच्या घडीला प्रियंकाला 'ग्लोबल स्टार' म्हणून ओळखलं जातं. सध्या प्रियंका तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट 'द ब्लफ'मुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिचा पहिला लूक समोर आलाय. प्रियंका एका समुद्री डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे.
प्रियंकाने स्वतः इंस्टाग्रामवर या चित्रपटातील काही थरारक फोटो शेअर केले आहेत. ज्यात प्रियंका रक्ताने माखलेली असून, हातात बंदूक धरलेली दिसतेय. तर दुसऱ्या एका फोटोतील तिचा अॅक्शन अवतार अधिकच प्रभावी वाटतो. प्रियंकाचा हा अॅक्शन अवतार पाहून केवळ तिचे चाहतेच नाही, तर तिचा पती निक जोनासही थक्क झाला आहे. निकने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रियंकाचा लूक शेअर करत अत्यंत प्रेमळ शब्दांत तिचं कौतुक केलं. तो म्हणाला, 'या चित्रपटात प्रियंका किती अद्भुत आणि शक्तिशाली आहे, हे जगानं पाहावं, याची मी आतुरतेने वाट पाहत आहे".
काय आहे सिनेमाची कथा?
महिला समुद्री डाकू 'ब्लडी मेरी'ची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. कुटुंबियांची रक्षा करण्यासाठी धडपडणारं प्रियंकाचं पात्र आहे. एकेकाळी समुद्रात दहशतीचं दुसरं नाव असलेली ही 'ब्लडी मेरी' आपला रक्तरंजित भूतकाळ विसरून शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. मात्र, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. जुने शत्रू पुन्हा समोर उभे ठाकतात आणि तिला आपल्या कुटुंबासाठी पुन्हा एकदा शस्त्र हातात घेणं भाग पडतं. अत्यंत रहस्यमय असा हा सिनेमा आहे.
कधी आणि कुठे होणार प्रदर्शित?
रुसो ब्रदर्स निर्मित आणि फ्रँक ई. फ्लॉवर्स दिग्दर्शित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी थेट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रियंकासोबत कार्ल अर्बन, टेमुएरा मॉरिसन आणि इस्माइल क्रूझ कॉर्डोवा यांसारखे आंतरराष्ट्रीय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.