परिणीती-राघवला बाळ झाल्यावर प्रियंका चोप्रा झाली भावुक, दिल्या खास शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:04 IST2025-10-20T12:01:38+5:302025-10-20T12:04:29+5:30
प्रियंका चोप्रा मावशी बनली आहे.

परिणीती-राघवला बाळ झाल्यावर प्रियंका चोप्रा झाली भावुक, दिल्या खास शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार राघव चड्ढा आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या जोडप्याने दिवाळीच्या मुहूर्तावर आमच्या घरी गोंडस मुलाचं आगमन झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. प्रियंका चोप्रा ही देखील या बातमीने खूप आनंदित झाली आहे.
मावशी बनलेल्या प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर आपली बहीण परिणीती आणि मेहुणा राघव यांच्यासाठी एक खास मेसेज शेअर केला. परिणीती आणि राघवची पोस्ट शेअर करत प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिले, "परिणीती आणि राघव यांना खूप खूप शुभेच्छा".
सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. अनन्या पांडे, क्रिती सॅनन, हरभजन सिंग, आयुष्मान खुराना, मनीष मल्होत्रा, जेनिफर विंगेट, सुनील ग्रोव्हर, भारती सिंग आणि नील नितीन मुकेश यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी या जोडप्याला भरभरून अभिनंदन केले आहे.
लंडनमध्ये झाली होती पहिली भेट
परिणीती चोप्रा व राघव चड्ढांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. उदयपूरमध्ये यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. या दोघांची पहिली भेट लंडन येथे झाली होती. राघव यांना राजकीय कारकिर्दीसाठी तर परिणीतीला अभिनय क्षेत्रातील कामासाठी ब्रिटिश काउन्सिलकडून पुरस्कार मिळणार होता. यानंतर दोघंही दिल्लीत भेटले. त्यांच्या प्रेम कहाणीला २०२२ पासून खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. परिणीतीच्या 'चमकीला' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं अन् दोघांनी सप्टेंबर २०२३ मध्ये थाटामाटात लग्न केलं. लग्नाच्या जवळपास दोन वर्षानंतरच या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. या जोडप्याने त्यांच्या बाळाची झलक किंवा त्याचे नाव अद्याप चाहत्यांसोबत शेअर केलेले नाही.