प्रिती झिंटाचा कोट्यवधींचा तोटा, १७ कोटींचं घर 'एवढ्या'च किंमतीत विकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:18 IST2025-11-28T10:06:06+5:302025-11-28T10:18:06+5:30
बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटानं मुंबईतील वांद्र्यातील एक प्रीमियम अपार्टमेंट विकलं आहे.

प्रिती झिंटाचा कोट्यवधींचा तोटा, १७ कोटींचं घर 'एवढ्या'च किंमतीत विकलं
गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत. अमिताभ बच्चन ते अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनीही त्यांच्या निवासी मालमत्ता विकल्या आहेत. अशातच बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटानं मुंबईतील वांद्र्यातील एक प्रीमियम अपार्टमेंट विकलं आहे. पण, या व्यवहारामध्ये प्रिती झिंटाला फायदा नव्हे तर कोटींचा तोटाच झाला आहे.
प्रिता झिंटानं हे अपार्टमेंट ऑक्टोबर २०२३ मध्ये १७.०१ कोटी रुपयांना खरेदी केलं होते. तर आता ते तिनं विशाल कल्याण मिर्चंदानी यांना १४.०८ कोटी रुपयांना विकलं आहे. या व्यवहाराची नोंदणी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली आहे. त्यासाठी १६.४७ लाखांहून अधिक मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आलं आहे. हे अपार्टमेंट खरेदी करताना आणि विक्री करतानाच्या किंमतीत मोठा फरक आहे.
अभिनेत्रीला या व्यवहारात २ कोटी ९३ लाख इतका निव्वळ तोटा झाला आहे. याशिवाय, मालमत्ता खरेदी करताना भरलेले मुद्रांक शुल्क आणि विक्री करताना लागलेला अन्य खर्च विचारात घेतल्यास, एकूण तोटा यापेक्षा अधिक आहे. रुस्तमजी ग्रुपच्या 'परिश्रम बाय रुस्तमजी' या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर असलेलं हे अपार्टमेंट १४७४ चौरस फुटांचं आहे. त्यासोबत दोन कार पार्किंगची जागादेखील आहे. तोटा होत असूनही प्रिता झिंटानं हे अपार्टमेंट का विकलं, याबद्दल माहिती समोर आलेली नाही.
प्रिती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. अधूनमधून ती भारतात येत असते. तसंच ती आयपीएलच्या पंजाब किंग्स संघाची मालकीण आहे. प्रिती सिनेइंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते. तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असेल्या चाहत्यांची इच्छा लवकरच पुर्ण होणार आहे. कारण, अभिनेत्री लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर १९४७' या चित्रपटातून इंडस्ट्रीत कमबॅक करणार आहे. आमिर खान निर्मित हा चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. तिच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर तब्बल१५० कोटी रुपये तिचं नेटवर्थ आहे.