"ड्रग्ज घेतले म्हणून कॉलेजमधून काढलं", प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा; आईने गाजवलीय मराठी इंडस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:31 IST2025-05-08T13:28:36+5:302025-05-08T13:31:20+5:30
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता ड्रगच्या आहारी गेला होता. त्यामुळेच त्याला कॉलेजमधून काढण्यात आलं होतं. त्याच्या आईने मराठी इंडस्ट्री गाजवली आहे

"ड्रग्ज घेतले म्हणून कॉलेजमधून काढलं", प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा; आईने गाजवलीय मराठी इंडस्ट्री
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते नशेच्या आहारी गेले होते. संजय दत्तसारख्या अभिनेत्यांना तर नशमुक्ती केंद्रात जावं लागलं होतं. अशातच बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्याने एका मुलाखतीत ड्रग्ज घेत असल्याने त्याला कॉलेजमधून काढण्यात आलं, याचा खुलासा केला. हा अभिनेता आहे प्रतीक बब्बर. प्रतीक (pratik babbar) हा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (smita patil) यांचा मुलगा. नुकतंच प्रतीकने गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. ड्रगचं सेवन करत असल्याने प्रतीकला नामांकित कॉलेजने काढून टाकलं होत.
प्रतीक बब्बरला ड्रगच्या आहारी गेला होता
अभिनेता प्रतीक बब्बरचे बाबा राज बब्बर आणि आई स्मिता पाटील हे दोघंही नामवंत अभिनेते आहेत. प्रतीकने बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. प्रतीकने आपल्या नशेच्या व्यसनाविषयी मोठं वक्तव्य केलं. प्रतीक म्हणाला की, "गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या आजी-आजोबांनी माझं सर्वात वाईट रूप पाहिलं. मी त्या काळात खूपच नशेत असायचो. माझ्या आजीचा मृत्यू झाला तेव्हाही मी पूर्णपणे नशेत होतो. आजही मला याचं फार दुःख आहे. कधी कधी वाटतं की जर त्यांनी आज मला पाहिलं असतं, मी आज कोणत्या प्रकारचा माणूस झालोय हे त्यांना दिसलं असतं तर त्यांना बरं वाटलं असतं."
प्रतीक पुढे म्हणाला, "मी 'जाने तू या जाने ना'ची शूटिंग केली आणि नंतर व्हिस्लिंग वूड्समध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलो. तिथे मी दोन वर्षं होतो. पण मला खरंच काहीच समजत नव्हतं, मी नेमकं काय करत होतो. पण नंतर मला ड्रग्जच्या व्यसनामुळे व्हिस्लिंग वूड्समधून काढून टाकण्यात आलं. आता जेव्हा मी हे आठवतो, तेव्हा मला ही घटना खूप मजेशीर वाटतं. मी ज्या ज्या शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये गेलो, तिथून मला बाहेर काढण्यात आलं. मी लोकांसाठी एक धोकादायक माणूस बनलो होतो." अशाप्रकारे प्रतीकने प्रामाणिकपणे या गोष्टीचा खुलासा केला. प्रतीकने काहीच दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत लग्न केलं.