विस्कटले बालपण! आईच्या आठवणीने या अभिनेत्याला बनवले होते ड्रग्ज अॅडिक्ट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 10:58 IST2019-11-28T10:36:14+5:302019-11-28T10:58:55+5:30
एका मुलाखतीत या अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले.

विस्कटले बालपण! आईच्या आठवणीने या अभिनेत्याला बनवले होते ड्रग्ज अॅडिक्ट!!
आपल्या सशक्त अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर याचा आज वाढदिवस. प्रतिकचे आयुष्य अनेक चढऊतारांनी भरलेले राहिले. प्रतिकच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्याची आई स्मिताचे निधन झाले होते. आईच्या निधनानंतर प्रतिक आपल्या आजीकडे लहानाचा मोठा झाला. या काळात आपल्या वडिलांचा प्रचंड द्वेष करायचा. याच काळात तो ड्रग्जच्या आहारी गेला. आज प्रतिक या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. पण एका मुलाखतीत प्रतिकने खासगी आयुष्यातील त्या दिवसांबद्दल सांगितले होते.
एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल खुलासा केला होता. ‘माझ्या वडिलांना माझ्यासाठी वेळ नव्हता. सगळे लोक मला माझ्या आईच्या यशाबद्दल सांगायचे. पण मला त्यामुळे काहीही फरक पडणार नव्हता. आई माझ्यासोबत का नाही, या एकाच प्रश्नाने मी बैचेन होतो. वयाच्या 12 व्या वर्षी मी ड्रग्जच्या आहारी गेलो होतो. त्यामुळे एकदा नाही तर दोनदा मला रिहॅब सेंटरमध्ये भरती करण्यात आले. ड्रग्जने मला मरणाच्या दारात उभे केले होते. माझी आजी माझ्या आईसारखी होती. पण नातवाचे हाल बघून माझ्या चिंतेत तिने प्राण सोडले. एक दिवसही ड्रग्ज मिळाली नाही की मी अस्वस्थ व्हायचो,’ असे प्रतिकने या मुलाखतीत सांगितले होते.
‘ बॉलिवूड कलाकारांनी नशेच्या आहारी जाणे खूप सामान्य गोष्ट आहे, असे लोकांना वाटते. पण मला हे व्यसन माझ्या विस्कटलेल्या बालपणामुळे लागले. माझ्या मनात असे अनेक प्रश्न होते ज्यांची उत्तर मला मिळत नव्हती. याच प्रश्नांपासून दूर पळण्यासाठी मी ड्रग्सचा आधार केला. आपण ड्रग्जच्या आहारी गेलो आहोत, हे स्वीकारणे सर्वात महत्त्वाचे असते. जेव्हा आपण हे स्वीकारतो त्यावेळी आपण रिकव्हरीकडे पहिले पाऊल टाकतो. आज मी यातून पूर्णपणे बाहेर पडलो आहे. आता फिटनेस आणि माझे काम यावर मी माझे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे,’असेही त्याने सांगितले होते.
प्रतिकने याचवर्षी गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्न केले. लग्नापूर्वी आठ वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.