गरोदर असतानाच भावाची आत्महत्या, पूजा बेदीला बसलेला मोठा धक्का; म्हणाली- "मला भीती होती की माझं मिसकॅरेज..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:58 IST2025-10-19T12:57:26+5:302025-10-19T12:58:53+5:30
कबीर बेदींचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या २६व्या वर्षीच आत्महत्या करत मृत्यूला कवटाळलं. त्याच्या आत्महत्येवेळी पूजा बेदीही तिथे होती. भावाची आत्महत्या हा तिच्यासाठी मोठा धक्का असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

गरोदर असतानाच भावाची आत्महत्या, पूजा बेदीला बसलेला मोठा धक्का; म्हणाली- "मला भीती होती की माझं मिसकॅरेज..."
कबीर बेदी हे बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. त्यांनी ८०-९०चं दशक गाजवलं. पण, बॉलिवूड करिअरपेक्षा किरण बेदी त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत होते. कबीर बेदींचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या २६व्या वर्षीच आत्महत्या करत मृत्यूला कवटाळलं. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. सिद्धार्थ सिझोफ्रेनिया आजाराशी झुंज देत होता. त्याच्या आत्महत्येवेळी पूजा बेदीही तिथे होती. भावाची आत्महत्या हा तिच्यासाठी मोठा धक्का असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
पूजा बेदीने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितलं की सिद्धार्थने आत्महत्या केली तेव्हा ती आणि कबीर बेदी अमेरिकेत होते. त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. याची कल्पनाही कधी केली नव्हती असं तिने सांगितलं. ज्यावेळी सिद्धार्थने आत्महत्या केली तेव्हा ती गरोदर होती. पूजा म्हणाली, "वडिलांनी मला तेव्हा शांत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पोटात जे मूल वाढत होतं त्यासाठी मला शांत राहणं गरजेचं होतं. या मानसिक धक्क्यामुळे माझं मिसकॅरेज व्हावं असं मला वाटत नव्हतं. माझ्या बाळावर याचा परिणाम होऊ द्यायचा नव्हता".
"मी खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या भावावर खूप प्रेम करायचे आणि त्याची खूप आठवण यायची. पण मला माहित होतं की त्याचा प्रवास संपला आहे आणि मला अजून जगायचं आहे. सिद्धार्थने माझ्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी एक चिठ्ठी लिहली होती. ती घटना अनावश्यक होती. त्याने अशाप्रकारे त्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने वेगळा विचार केला असता तर वेगळ्याप्रकारे जीवन जगला असता", असंही पूजा बेदी म्हणाली.