"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 09:47 IST2025-05-26T09:46:36+5:302025-05-26T09:47:21+5:30
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'केसरी वीर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने भारत-पाकिस्तान तणाव आणि हेराफेरी ३वरही भाष्य केले.

"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'केसरी वीर' (Kesari Veer Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने भारत-पाकिस्तान तणाव आणि हेराफेरी ३वरही भाष्य केले. नुकतेच एका मुलाखतीत सुनील शेट्टीने पाकिस्तानला राक्षसी मानसिकता असलेले म्हटले आहे. या दरम्यान त्याने 'बॉयकॉट तुर्की'चेही समर्थन केले आहे.
सुनील शेट्टी नुकताच त्याच्या 'केसरी वीर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूरमध्ये होता. या दरम्यान, माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, 'राक्षसी मानसिकता असलेले लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. अशा लोकांविरुद्ध लढणे खूप महत्वाचे आहे. असे लोक स्वतःचे रक्षण करण्यासाठी धर्माचा आधार घेतात.'
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल सुनील शेट्टी म्हणाला...
'केसरी वीर' अभिनेता 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल पुढे म्हणाला की, बॉलिवूड नेहमीच सैन्य आणि सैनिकांच्या आदरात उभा राहिला आहे. देश आणि समाजाचा विचार केला तर बॉलिवूड नेहमीच सर्वांच्या पाठीशी उभे राहताना दिसते. आपल्या देशाच्या सैन्याचाही अभिमान आहे. बॉलिवूडमधील अनेक लोकांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि सैन्याच्या शौर्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
'बॉयकॉट तुर्की'ला अभिनेत्याचे समर्थन
तुर्की आणि अझरबैजानच्या बहिष्काराबद्दल सुनील शेट्टी म्हणाला, जेव्हा पंतप्रधान आणि इतर लोकांनी निर्णय घेतला आहे, तेव्हा संपूर्ण देशाने निर्णयाचा आदर केला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने देशाच्या निर्णयासोबत उभे राहिले पाहिजे. बॉलिवूड देशातील इतर लोकांसोबतही असेच करतो.
'केसरी वीर'ची कथा
यावेळी सुनील शेट्टीने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'केसरी वीर' हा हिंदी चित्रपट देखील देशभक्तीवर आधारित आहे. हा केवळ युद्धावर आधारित चित्रपट नाही तर तो आपल्या मातीशी असलेल्या नात्याची कहाणी सांगतो. तो पुढे म्हणाला की, आपल्याला मुघल आणि ब्रिटिशांबद्दल शिकवले जात होते पण आपल्या देशातील वीरांच्या कथा योग्य पद्धतीने सांगितल्या जात नव्हत्या. हा चित्रपट त्या इतिहासाला अधिक चांगल्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न आहे.