पत्रलेखानेही भरली राजकुमारची भांग; लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, कित्ती गोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 13:05 IST2021-11-22T13:04:27+5:302021-11-22T13:05:04+5:30
Rajkummar Rao-Patralekhaa's wedding : राजकुमार व पत्रलेखाने लग्नाचा अनसीन व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो प्रचंड भावूक करणारा आहे.

पत्रलेखानेही भरली राजकुमारची भांग; लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, कित्ती गोड
अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao ) आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल (Patralekhaa ) गेल्या 15 नोव्हेंबरला लग्नबेडीत अडकले. चंदीगडमध्ये दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता राजकुमार व पत्रलेखाने लग्नाचा अनसीन व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो प्रचंड भावूक करणारा आहे.
व्हिडीओची सुरूवात होते ती राजकुमारपासून. तो लग्नमंडपात उभा आहे आणि वधूच्या पोशाखात पत्रलेखा त्याच्याकडे येतेय. नवरी जवळ येते आणि राजकुमार आनंदाने बेभान होतो. शिटी वाजवत तिचं जोरदार स्वागत करतो. सप्तपदी, वरमाला असे काही क्षण व्हिडीओत येतात. पण सर्वात सुंदर क्षण यानंतर येतो. राजकुमार पत्रलेखाची भांग कुंकवाने भरतो आणि यानंतर पत्रलेखाही आपल्या नावाचं कुंकू त्याच्या भांगेत भरते. एकाक्षणी पत्रलेखाला पाहून राजच्या डोळ्यांत अश्रू तरळतात आणि पत्रलेखा त्याचे अश्रू अलगद टिपते...
लग्नाच्या मंडपातील दोघांचा संवादही व्हिडीओत आहे. ‘राज, 11 वर्ष झालीत, पण असं वाटतं जणू मी अनेक जन्मांपासून तुला ओळखते. मला पूर्ण विश्वास आहे, आपलं नातं हे जन्माजन्मांचं आहे,’ असं पत्रलेखा म्हणते....
यावर राजकुमार म्हणतो, ‘11 वर्ष झालीत, पण जणू आपण आत्ताचं डेटींग सुरू केलं, असं वाटतंय. आपल्याला एकमेकांची सोबत इतकी आवडते की, वाटलं चला पती-पत्नी बनून राहू...’
‘द वेडिंग फिल्मर’ या युट्यूब चॅनलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. खूप सुंदर, असं क्रिती सॅननने लिहिलं आहे. तर जस्ट ब्युटिफुल, अशी कमेंट भूमी पेडणेकरने केली आहे. फराह खान राजकुमार व पत्रलेखाच्या लग्नाची साक्षीदार होती. ती या लग्नात सामील होण्यासाठी चंदीगडला गेली होती. तिनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू आलेत, असं तिने लिहिलं आहे.