Pathan: आपण सगळे एकाच माय-बापाची लेकरं, ते म्हणजे 'भारत'; शाहरुखने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 18:30 IST2023-01-28T18:13:54+5:302023-01-28T18:30:37+5:30
'पठाण' चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे.

Pathan: आपण सगळे एकाच माय-बापाची लेकरं, ते म्हणजे 'भारत'; शाहरुखने स्पष्टच सांगितलं
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shahrukh Khan)चा 'पठाण' (Pathaan) चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. 'पठाण'ने केवळ भारतातच धुमाकूळ घातला नाही तर अमेरिकेत यशाचा नवा विक्रम नोंदवताना 'अवतार द वे ऑफ वॉटर' सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. हे पाहून शाहरुख खानचे चाहते खूप खूश झाले आहेत. पठाणने तीन दिवसांत तब्बल ३०० कोटींची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे, शाहरुखही चांगलाच खुश आहे. त्यातच, शाहरुखने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आज चाहत्यांशी संवाद साधला, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
'पठाण' चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. रिपोर्ट्सनुसार, २५ जानेवारी रोजी चित्रपट उत्तर अमेरिकेत प्रथम क्रमांकावर आला, तर अवतार २ ने दुसरा क्रमांक पटकावला. 'पठाण' २५ जानेवारी रोजी जगभरातील ८००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १०६ कोटींची कमाई केली, हा एक विक्रम आहे. एकीकडे पठाण विक्रमांचे मनोरे चढवत असताना शाहरुखही चाहत्यांची क्रेझ पाहून उत्साही झाला आहे. शाहरुखने आज #AskMe या ट्विटर स्पेसनुसार चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी, एका युजर्संच्या प्रश्नावर उत्तर देताना, आपण सर्वजण एकाचा माता-पित्याची मुलं आहोत, भारत... असे शाहरुखने म्हटले.
If there is one truth it is : ki hum sab ek hi maa aur pita ki santaan hain. Bharat ke. Hindustan ke…India ke. Jai Hind. #Pathaanhttps://t.co/Cb7L5qrUOa
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023
"पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेम हे जात, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांपेक्षा वरचढ आहे हे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाचं यश हे तुमचं आहे. तुम्ही सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचं काम करत आहात. जय हिंद", असे ट्विट एका युजर्संने केले होते. शाहरुखने या ट्विटवर रिप्लाय देत आपण सर्वजण एकाच माता-पित्याची लेकरं आहोत, असे शाहरुखने म्हटले. शाहरुखने लिहिलं की, "आपण सर्व भारतमातेची मुले आहोत. हेच सत्य आहे. जय हिंद".
दरम्यान, शाहरुखने या #Askme स्पेसमध्ये अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. त्यामध्ये, अनेकांनी हटके प्रश्न विचारले असून शाहरुखनेही त्याच स्टाईलने प्रेमळ उत्तर दिले आहेत.