'जोधा अकबर' फेम परिधी शर्माची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कसा मिळाला 'हक' सिनेमा? म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:58 IST2025-11-08T14:57:43+5:302025-11-08T14:58:14+5:30
इम्रान हाश्मी-यामी गौतमसोबत केली स्क्रीन शेअर, टीव्ही कलाकारांसोबत भेदभाव होतो का? म्हणाली...

'जोधा अकबर' फेम परिधी शर्माची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कसा मिळाला 'हक' सिनेमा? म्हणाली...
'जोधा अकबर' ही टीव्ही मालिका एकेकाळी खूप गाजली होती. यातील जोधा अकबर च्या भूमिकेत अभिनेत्री परिधी शर्मा आणि अभिनेता रजत टोकस दिसले होते. मालिका संपल्यानंतर दोघं जणू गायबच झाले. आता परिधी शर्माने अनेक वर्षांनी चर्चेत आली आहे. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'हक' सिनेमात ती इम्रान हाश्मीच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. तिला ही भूमिका कशी मिळाली याविषयी तिने खुलासा केला आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत परिधी शर्मा म्हणाली, "मी या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. कास्टिंग डायरेक्टर शिवम गुप्ताने माझी ऑडिशन घेतली होती. यासाठी मी खूप तयारी केली होती. पण मला नीट सूर मिळत नव्हता. ऑडिशनपूर्वी मी स्क्रिप्ट वाचली. त्यात सीन होता की मी शाह बानोला एवढं मोठं पाऊल उचलू नको असं समजावते. तसंच इतर महिलांप्रमाणेच जे सांगितलं जातं ते कर असं मी तिला म्हणते. कुठे ना कुठे मी अशा महिलांचं प्रतिनिधित्व करत होते. मला कळत नव्हतं. मी शिवमकडे थोडा वेळ मागितला. यानंतर तीन दिवस मी शाह बानोसाठी पत्र लिहित होते. याचा सिनेमाशी काहीही संबंध नाही. आपली भूमिका समजून घेण्यासाठी मी ते लिहित होते. तिसऱ्या दिवशी मी ऑडिशन दिली. सगळ्यांना माझा परफॉर्मन्स आवडला आणि अशा प्रकारे मला सिनेमा मिळाला."
परिधीने बॉलिवूडमधील भेदभावावरही भाष्य केलं. ती म्हणाली, "टीव्ही कलाकारांसोबत खरोखरंच बॉलिवूडमध्ये भेदभाव होतो. कुठे ना कुठे हे सत्य आहे. माध्यम कोणतंही असो, कलाकार कलाकार असतो हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक माध्यमाचा एक पॅटर्न असतो जो शिकून घेणं गरजेचं असतं. पण कलाकारांमध्ये हा भेदभाव होता कामा नये. पण काय करणार आपल्याकडे काही लोकांचा माइंड सेट असाच आहे."
परिधी शर्माला जेव्हा रजत टोकसबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने आपण त्याच्यासोबत संपर्कात नसल्याचं सांगितलं. तसंच मालिकेच्या सेटवरही आमच्यात फक्त प्रोफेशनल नातं होतं. कधी मैत्री नव्हती असा खुलासा केला.