पाकिस्तानात बंदी तरीही लग्नात वाजत आहेत 'धुरंधर'ची गाणी! 'शरारत' गाण्यावर मुलींनी केला तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:58 IST2026-01-06T11:55:47+5:302026-01-06T11:58:56+5:30
धुरंधर गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी तुफान डान्स केला आहे. हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वांनी पसंती दिली आहे

पाकिस्तानात बंदी तरीही लग्नात वाजत आहेत 'धुरंधर'ची गाणी! 'शरारत' गाण्यावर मुलींनी केला तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना स्टारर 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, ज्या पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तिथेही या चित्रपटाच्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही पाकिस्तानी तरुणी एका लग्नाच्या समारंभात 'धुरंधर'मधील गाजलेल्या 'शरारत' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी अतिशय सुंदर लेहेंग्यात दिसत असून त्यांनी या गाण्याच्या मूळ हुक स्टेप्स अतिशय आत्मविश्वासाने केल्या आहेत. त्यांच्या या परफॉर्मन्सने उपस्थितांची मने तर जिंकलीच, पण सोशल मीडियावरही या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात हे गाणे अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा आणि आयशा खान यांच्यावर चित्रित झाले आहे. या गाण्याला जस्मिन सँडलास आणि मधुबंती बागची यांनी आपला आवाज दिला असून, शाश्वत सचदेव यांनी ते संगीतबद्ध केले आहे.
Dance on Dhurandhar Movie Song Shararat at Pakistani Wedding 😍 pic.twitter.com/Utn7kxOGo4
— Rosy (@rose_k01) January 4, 2026
हे गाणे सध्या यूट्यूबवर १०० दशलक्षाहून अधिक व्ह्यूजसह ट्रेंडिंगमध्ये आहे. विशेष म्हणजे, 'धुरंधर' चित्रपटात दाखवलेल्या काही संवेदनशील विषयामुळे पाकिस्तान आणि काही आखाती देशांनी यावर बंदी घातली होती. पण तरीही एका अहवालानुसार पाकिस्तानमधील अनेक लोकांनी हा चित्रपट पायरसीच्या माध्यमातून गुपचुप पाहिला असल्याचं उघड झालं.
नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी "पाकिस्तानात चित्रपट बॅन आहे, तरीही तिथे बॉलीवूडची गाणी घराघरात पोहोचली आहेत" असे म्हटले आहे, तर काहींनी या तरुणींच्या डान्स कौशल्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. एकंदरीतच, बॉक्स ऑफिसवर १२०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'धुरंधर'ची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही, हेच यावरून दिसून येते.