पुन्हा एकदा शाहरूख खान आणि आलिया भट दिसणार एकत्र, किंग खानची भूमिका असणार वेगळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 16:36 IST2021-02-16T16:36:03+5:302021-02-16T16:36:40+5:30
‘डिअर जिंदगी’ चित्रपटानंतर शाहरुख खान आणि आलिया भट पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे.

पुन्हा एकदा शाहरूख खान आणि आलिया भट दिसणार एकत्र, किंग खानची भूमिका असणार वेगळी
‘डिअर जिंदगी’ चित्रपटानंतर शाहरुख खान आणि आलिया भट पुन्हा एकदा डार्लिंग्स चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. पण यावेळी शाहरुख खान चित्रपटामध्ये निर्माते म्हणून काम करत आहे. डार्लिंग्स चित्रपटामध्ये एका आई आणि मुलीची कथा रेखाटण्यात आली आहे. जसमीत डार्लिंग्स चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
डार्लिंग्स चित्रपटातून जसमीत दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. फोर्स २, फन्ने खां आणि पति पत्नी और वो सारखे चित्रपट त्याने लिहिले आहेत. डार्लिंग्स चित्रपटात आलिया भट्टसह शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू देखील काम करणार आहेत. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटात आई-मुलीची एक विचित्र कथा आहे. या चित्रपटात आलिया भट मुलगी आणि शेफाली शाह आईची भूमिका करणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटूंबाच्या पार्श्वभूमीवर ही कथा आधारित आहे. डार्लिंग्स चित्रपटाचे शूटिंग २०२१ मध्येच सुरू होणार असून प्री-प्रोडक्शनचे काम सध्या सुरू आहे. याचवर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान डार्लिंग्स या चित्रपटाव्यतिरिक्त पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटात तो दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे. पठाण चित्रपटात जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपणार आहे. तसेच ती संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाड या चित्रपटात दिसणार आहे.
तर शाहरूख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो शेवटचा २०१८ साली झिरो चित्रपटात दिसला होता. त्यानंतर आता तो रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो पठाण चित्रपटात काम करताना दिसणार आहे.