रानू मंडलच्या पडत्या काळात या प्रसिद्ध अभिनेत्याने दिला मदतीचा हात,पुन्हा मिळाली गाण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 13:24 IST2021-11-20T13:08:43+5:302021-11-20T13:24:40+5:30
एक प्यार का नगमा हे गाणं गात रानू मंडल स्टार बनली खरी पण तिला मिळालेले यश काही टिकवता आले नाही.

रानू मंडलच्या पडत्या काळात या प्रसिद्ध अभिनेत्याने दिला मदतीचा हात,पुन्हा मिळाली गाण्याची संधी
सोशल मीडियावर पुन्हा एकदा रानू मंडलची जोरदार चर्चा आहे. तिच्या सुरेल आवाजातलं ''एक प्यार का नगमा'' असं काही सुपरहिट झालं होतं की प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. कधी काळी रानाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागणारी रानू मंडल सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आली.रानू मंडलला हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली.
कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडलनं स्वप्नातही विचार केला नसेल. एक प्यार का नगमा हे गाणं गात रानू मंडल स्टार बनली खरी पण तिला मिळालेले यश काही टिकवता आले नाही.अचानक मिळालेल्या प्रसिद्धीने रानू मंडल स्वतः स्टार समजू लागली आणि भेटायला येणा-या चाहत्यांसोबतच उद्धटपणे वागू लागली.
रानू मंडलच्या अशा वागण्यामुळेच तिच्या वाट्याला पुन्हा जुने दिवसच आले. जिथून रानू मंडला आली होती, त्याच स्टेशनवर पुन्हा तिच्यावर भीग मागत गुजरान करायची वेळ आली.मात्र रानू मंडलकडून भूतकाळात झालेल्या चुका विसरत तिला पुन्हा एक संधी मिळाली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याने आता रानू मंडलला मदत करायचे ठरवले आहे. या अभिनेत्याने रानूला थेट चित्रपटात गाण्याची संधी मिळवून दिली आहे.
तिला ही ऑफर बॉलिवूडमधून नाही तर बांगलादेशातून आली आहे. बांगलादेशातील चित्रपट स्टार हिरो आलोमने निर्मित केलेल्या दोन वेगवेगळ्या चित्रपटांसाठी रानू मंडलला दोन गाण्यांची ऑफर देण्यात आली आहे.आलमने स्वतः सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे.या बातमीनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर रानू मंडल चर्चेत आली आहे. रानू मंडलवर आता संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत. तिला ट्रोलही केले जात आहे. तर काहींना तिला पुन्हा एक संधी देण्यात यावी असेही वाटत आहे. आता मिळालेल्या संधीचे रानू कितपत सोनं करणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.