प्रसिद्धीसाठी नव्हे तर समाजकार्यासाठी सरसावले ‘हे’ तारे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 19:04 IST2017-09-09T13:29:27+5:302017-09-09T19:04:55+5:30
अबोली कुलकर्णी बॉलिवूड सिताऱ्यांचा केवळ फिल्मी चेहराच आपल्याला ठाऊक असतो. प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमर यांच्या मागे धावताना आपण त्यांना पाहतो. ...
.jpg)
प्रसिद्धीसाठी नव्हे तर समाजकार्यासाठी सरसावले ‘हे’ तारे !
बॉलिवूड सिताऱ्यांचा केवळ फिल्मी चेहराच आपल्याला ठाऊक असतो. प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमर यांच्या मागे धावताना आपण त्यांना पाहतो. मात्र, त्यांच्यात एक समाजप्रिय व्यक्तीही लपलेला असू शकतो, हे आपल्याला लक्षातच येत नाही. आता हेच पाहा ना, अलीकडेच दिया मिर्झा आणि तिचा पती साहिल संघा यांनी मुंबईतील जुहू बीच येथे जाऊन स्वच्छता अभियान राबवले. त्यांच्या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासोबतच काही जागरूक नागरिकही सामील झाले. दिया आणि साहिलप्रमाणेच आणखीही काही सितारे बॉलिवूडमध्ये असतील जे खऱ्या अर्थाने समाजासाठी काही करू इच्छितात. चला तर मग घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींचा आढावा...
* शबाना आझमी
एक उत्कृष्ट अभिनेत्री, उत्तम कलाकार म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे शबाना आझमी. त्यांनी चित्रपटांमध्ये काम करतांनाच एक वेगळा चेहरा समाजासमोर ठेवला. शबाना आझमी या महिलांच्या हक्कांसाठी नेहमी लढतात. फिल्मी जगतातील चुकीच्या गोष्टी, घटनांनाही त्या विरोध करताना दिसल्या आहेत.
* राहुल बोस
मोजक्याच चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय साकारणारा अभिनेता राहुल बोस याने मुंबईत पॅरेंट आॅर्गनायझेशन, एनजीओ, फाऊंडेशन एनजीओ तसेच दारिद्रयरेषेखालील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची निर्मिती केली आहे. समाजाप्रती आपण काही देणं लागतो याची जाणीव राहूल बोसला नेहमी असल्याचे दिसून आले आहे.
* नाना पाटेकर
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार नाना पाटेकर हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी पैसे उपलब्ध करून देतात. तसेच त्यांनी मक रंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून एक एनजीओ देखील सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पत्नींना १५,००० रूपयांची मदत संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते.
* मिलिंद सोमण
अभिनेता मिलिंद सोमण हा एका एनजीओशी निगडित आहे. या संस्थेत महिलांची फिटनेस आणि ब्रेस्ट कॅन्सर याविषयी जागृती कार्यक्रम घेण्यात येतात. त्याशिवाय नागरिकांचे स्वास्थ्य चांगले रहावे म्हणून १० किमी. मॅरेथॉन रेस तो वेगवेगळया शहरात घेत असतो. वेगवेगळया समाजातील महिलांमध्ये शिक्षण आणि स्वास्थ्य यांच्या बाबतीतील जागृती करण्याचे काम तो या माध्यमातून करत असतो.
* नंदिता दास
अभिनयाशिवाय सोशल अॅक्टिव्हिटी, दिग्दर्शन आणि लेखन यांच्यामध्ये अग्रेसर असलेली अभिनेत्री नंदिता दास ही तिची स्वत:ची एक ‘डार्क इज ब्युटीफुल’ हे कॅम्पेन चालवते. वर्णद्वेषाला बाय बाय करून सावळया महिलांनीही मुक्त, स्वछंद जगावे म्हणून तिने कार्य चालवले आहे.