आता नृत्यासोबत अभिनयही - धर्मेश येलांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 18:27 IST2016-06-30T12:57:03+5:302016-06-30T18:27:03+5:30

डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला धर्मेश सध्या डान्स प्लस या कार्यक्रमात मेन्टॉरची भूमिका साकारत आहे. तर बँजो ...

Now acting with the dancing - Dharmesh Yeelande | आता नृत्यासोबत अभिनयही - धर्मेश येलांडे

आता नृत्यासोबत अभिनयही - धर्मेश येलांडे

न्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला धर्मेश सध्या डान्स प्लस या कार्यक्रमात मेन्टॉरची भूमिका साकारत आहे. तर बँजो या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या या नव्या इनिंगबद्दल त्याने सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...

डान्स प्लस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे विजेतेपद तू मिळवले होते आणि आता या दुसऱ्या सिझनला सुरुवात होत आहे. दुसऱ्या सिझनची तयारी कशाप्रकारे सुरू आहे?
पहिल्या सिझनचे विजेतेपद पटकवल्यामुळे दुसऱ्या सिझनमध्ये मला अधिक दडपण आलेले आहे. पहिल्या सिझनपेक्षा चांगले नृत्य माझ्या टीमने सादर केले पाहिजे यावर सध्या मी मेहनत घेत आहे. यावेळेच्या ऑडिशनला खूपच टायलेंटेड लोक आले होते. त्यातून काही ठरावीक लोकांचीच निवड करणे हे अतिशय कठीण काम होते. चांगल्यातल्या चांगल्या डान्सरची निवड करून मी माझी टीम बनवली आहे. हे सगळे आपल्या नृत्यातून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतील हा मला विश्वास आहे. 
नृत्यासोबत तू अभिनयातही तुझे भाग्य आजमावत आहेस, तुझ्या या अभिनय प्रवासाविषयी काय सांगशील?
मला लहानपणापासून नृत्याची आवड होती. त्यामुळे मी खूप चांगला नर्तक, कोरिओग्राफर बनेल याची मला खात्री होती. पण मी अभिनय करेन असा मी कधी विचारही केलेला नव्हता. एबीसीडी आणि एबीसीडी २ या चित्रपटामुळे माझी अभिनयक्षमता लोकांसमोर मांडता आली. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये मी डान्सरचीच भूमिका साकारली असल्याने या चित्रपटांमध्ये अभिनय करणे मला तितकेसे कठीण वाटले नाही.
बँजो या चित्रपटात तू वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेस. या चित्रपटात तू नृत्य करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही असे म्हटले जात आहे, हे खरे आहे का?
बँजो या चित्रपटात मी ड्रम वाजवणाऱया एका मुलाची भूमिका साकारत आहे. तो नेहमीच प्रत्येकावर भडकणारा, चिडचिड करणारा, लोकांशी उर्मट वागणारा असा आहे. मी माझ्या आयुष्यात यापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याने ही भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण दिग्दर्शक रवी जाधव, रितेश देशमुख या सगळ्यांनीच मला चांगले मार्गदर्शन दिले. त्यांच्यामुळेच मी ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारू शकलो आहे असे मला वाटते. या चित्रपटात माझे एकही नृत्य नसणार असेच ठरले होते. पण मी माझ्या नृत्यासाठी ओळखला जात असल्याने एक तरी माझे नृत्य असावे असे रवी जाधव यांचे म्हणणे होते.  त्यामुळे संपूर्ण चित्रपटात केवळ १० सेकंद मी नृत्य करणार आहे. हे १० सेकंदाचे नृत्य मी स्वतः कोरिओग्राफ केलेले आहे. 
तू एका रिअॅलिटी शोमधून आलेला आहेस, रिअॅलिटी शोचा स्पर्धकांना त्यांच्या भविष्यासाठी फायदा होतो असे तुला वाटते का?
कोणताही रिअॅलिटी शो हा तुम्हाला केवळ प्लॅटफोर्म मिळवून देतो. भविष्यात कशाप्रकारचे काम करायचे हे तुम्ही तुमचे ठरवायचे असते. काम करण्याची भूक ज्यांच्यात असते, ते यशस्वी ठरतात. जे केवळ ग्लॅमरच्या मागे धावतात, आपल्याला मिळालेल्या त्याच यशात समाधान मानतात, मेहनत घेत नाही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते असे मला वाटते. 
तू आता अभिनयातही करियर करण्याचे ठरवले आहेस का?
- मला चांगल्या भूमिका ऑफर झाल्या तर त्या नक्कीच करायच्या असे मी ठरवले आहे. बँजो या चित्रपटानंतर मी एबीसीडी ३ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच एक गुजराती भाषेतील चित्रपटही मी करत आहे.

Web Title: Now acting with the dancing - Dharmesh Yeelande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.