अखेर आठ महिन्यांची ‘बंदी’ उठली! या तारखेला रिलीज होणार ‘नो फादर्स इन कश्मीर’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 12:38 IST2019-03-15T12:33:32+5:302019-03-15T12:38:29+5:30
ऑस्कर नॉमिनेटेड दिग्दर्शक अश्विन कुमारचा ‘नो फादर्स इन कश्मीर’ या चित्रपटावरची बंदी अखेर हटली आणि पहिले पोस्टर प्रदर्शित झाले.

अखेर आठ महिन्यांची ‘बंदी’ उठली! या तारखेला रिलीज होणार ‘नो फादर्स इन कश्मीर’!!
ठळक मुद्देअश्विन कुमारची शॉर्ट फिल्म ‘लिटिल टेररिस्ट’ला ऑस्करचे नामांकन मिळाले होते.
ऑस्कर नॉमिनेटेड दिग्दर्शक अश्विन कुमारचा ‘नो फादर्स इन कश्मीर’ या चित्रपटावरची बंदी अखेर हटली आणि पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. हा चित्रपट अश्लिलता आणि हिंसाचाराला चालना देणारा असल्याचे सांगत सेन्सॉर बोर्डाने आठ महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादली होती. चित्रपटाच्या टीमने सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. चित्रपटाची टीम आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यातील दीर्घ लढाईनंतर अखेर सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट देत चित्रपटावरची बंदी हटवली. आता हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला रिलीज होतोय. याचसोबत चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले.
या पोस्टरमध्ये एक किशोरवयीन जोडपे दिसतेय. ‘सभी सोचते है कि वह कश्मीर को जानते है,’ अशी या पोस्टरची टॅगलाईन आहे. एका ब्रिटीश-काश्मिरी नूर नामक किशोरवयीन मुलीची कथा यात रेखाटण्यात आली आहे. आपल्या पित्याचा शोध घेत असताना नूरला तिचा भूतकाळ सापडतो, असे याचे ढोबळ कथानक आहे. खुद्द अश्विन कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय या चित्रपटाची कथाही त्यांनी स्वत: लिहिली आहे. आलिया भट्टची आई सोनी राजदान, कुलभूषण खरबंदा, अंशुमान झा, माया सराओ यात मुख्य भूमिकेत आहेत. सेन्सॉर बोर्डाने बंदी लादल्यानंतर आलियाने या चित्रपटाच्या समर्थनार्थ टिष्ट्वट केले होते.
अश्विन कुमारची शॉर्ट फिल्म ‘लिटिल टेररिस्ट’ला ऑस्करचे नामांकन मिळाले होते. याशिवाय अश्विन यांच्या ‘इंशाअल्ला फुटबॉल’ आणि ‘इंशाअल्ला कश्मीर’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.