रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मणा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कडक मेहनत, लूक बघून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:06 IST2026-03-04T15:06:28+5:302026-03-04T15:06:59+5:30
रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मण'च्या भूमिकेत दिसणारा हा अभिनेता कोण?

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मणा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कडक मेहनत, लूक बघून चाहते थक्क
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी 'रामायण' हा चित्रपट सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भुमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार आहे. तर प्रभू श्रीराम यांच्या लाडक्या भावाची म्हणजेच 'लक्ष्मण'ची भूमिका लोकप्रिय अभिनेता रवी दुबे साकारणार आहे. या ऐतिहासिक भूमिकेसाठी रवीने शारीरिक, मानसिक व बौद्धिक तयारी केली, जी भूमिकेला पडद्यावर जिवंत करण्यासाठी गरजेची असते. या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्यानं कडक फिटनेस ट्रेनिंग घेतलं. याची एक झलक त्यानं नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रवि दुबे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. ते आपल्या चाहत्यांसोबत नियमितपणे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. अलीकडेच त्यानं आपल्या फिटनेसची झलक दाखवणारा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. या दमदार शर्टलेस फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. या फोटोला त्याने "रायझिंग अप" (Rising Up) असे कॅप्शन दिले असून बॅकग्राउंडला "आयज ऑफ द टायगर" हे आयकॉनिक गाणे वाजत आहे. एखाद्या योध्याला साजेशी शरीरयष्टी त्याने कमावली असल्याचे या फोटोवरून स्पष्ट होते.
'लक्ष्मण'च्या भूमिकेसाठी कठोर मेहनत
रवी दुबेने या भूमिकेसाठी कमालीची शिस्त पाळली आहे. 'रामायण'सारख्या मोठ्या प्रकल्पाचा पहिला भाग चित्रित झाला असून, रवीच्या या शरीरयष्टीवरून त्याने या पात्रासाठी किती घाम गाळला आहे, याची कल्पना येते. रवीचा हा नवीन अवतार पाहताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. "खरा योद्धा!", "काय जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आहे" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अनेकांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक करताना तो या भूमिकेसाठी 'परफेक्ट' असल्याचे म्हटले आहे.