"सेटवर शॉर्टसर्किट झालं, ६ महिन्यांच्या लेकीला...", निशिगंधा वाड यांनी सांगितला हृतिकचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:24 IST2025-11-22T17:23:55+5:302025-11-22T17:24:37+5:30
हृतिक रोशनच्या चांगुलपणाचा आला अनुभव, तर सलमान खानने निशिगंधा वाड यांना..., अभिनेत्रीने सांगितली आठवण

"सेटवर शॉर्टसर्किट झालं, ६ महिन्यांच्या लेकीला...", निशिगंधा वाड यांनी सांगितला हृतिकचा किस्सा
मराठीतील गोड अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे अनेक चाहते आहेत. ९० च्या दशकात त्यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं. मालिकाही केल्या. नंतर त्या हिंदीतही झळकल्या. हिंदी मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. सलमान खान, हृतिक रोशनसोबतही त्यांनी काम केलं. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी दोन्ही अभिनेत्यांचा चांगुलपणाचा किस्सा सांगितला.
अमृता फिल्म्सला दिलेल्या मुलाखतीत निशिगंधा वाड यांनी हृतिक रोशनची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, "आप मुझे अच्छे लगने लगे' सिनेमा करताना हृतिक रोशन आधीच मोठा स्टार झाला होता. पण तो माणूस म्हणूनही खूप चांगला आहे याचा मला अनुभव आला. महबूब स्टुडिओमध्ये आम्ही शूट करत होतो. कलाकारांची अतिशय उत्तम सोय केलेली होती. तिथे हृतिकसाठी व्हॅनिटी व्हॅन होती. अचानक स्टु़डिओमध्ये शॉर्ट सर्किट झालं. बऱ्याच गोष्टी जळाल्या. सगळेच बाहेर बसून होते. दुसऱ्या व्हॅनिटी येतच होत्या. त्या येईपर्यंत माणसं बाहेरच होते."
त्या पुढे म्हणाल्या, "मला माझ्या लेकीला दूध पाजायची वेळ झाली होती कारण मी तिला माझ्याबरोबर घेऊन जायचे. ती अवघी ६ महिन्यांची होती. पण कुठे करणार हा मला प्रश्न पडला होता. तर हृतिक इतका चांगला होता तो मला म्हणाला, 'माझी व्हॅन आहे ना..तुम्ही तिथे बसा. मी बाहेर थांबतो.' मला त्याची ती कृती पाहून खूप छान वाटलं. विशिष्ट उंची गाठल्यावर किती माणसांचे पाय जमिनीवर राहतात. ज्यांचे राहतात मला वाटतं ते काळावर आपला ठसा उमटवूनच उरतात त्यातलाच एक हृतिक आहे."
सलमान खानची आठवण सांगत त्या म्हणाल्या, "सलमानबरोबर मी 'तुमको ना भूल पाएंगे','रेस' या सिनेमांमध्ये काम केलं. चांगल्या कलाकाराचं नेहमीच कौतुक असतं. आम्ही जयपूरला शेड्युल करुन आलो आणि विमानतळावर पोहोचलो. तेव्हा एक माणूस माझ्याजव पळत पळत आला आणि हे तुमच्यासाठी असं म्हणत त्याने एक गोष्ट समोर केली. मी म्हणाले, 'हे काय आहे? मी तर काहीच विसरले नाहीये'. तर तो म्हणाला, 'हे सलमान खानकडून आहे. सर्व सहकलाकारांसाठी एक गिफ्ट.' त्यामध्ये एक सुंदर घड्याळ होतं. तर ही एक कलेची कदर म्हणतो तसं आहे."