भारतीय गायिकेसोबत 'दमादम मस्त कलंदर' गाण्यावर थिरकले न्यूझीलंडचे पंतप्रधान, video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 13:32 IST2025-08-18T13:30:31+5:302025-08-18T13:32:21+5:30
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांचा भारतीय गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय गायिकेसोबत 'दमादम मस्त कलंदर' गाण्यावर थिरकले न्यूझीलंडचे पंतप्रधान, video व्हायरल
भारतीय गाण्यांची जादू जगभरात पसरली आहे. अनेक दशकांपासून भारतीय संगीत जगभरातील लोकांच्या मनात घर करत आहे. याचेच ताजं उदाहरण नुकतंच न्यूझीलंडमध्ये पाहायला मिळालं. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांचा भारतीय गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या नृत्यामध्ये विरोधी पक्षनेते क्रिस हिपकिन्स देखील त्यांच्या सोबत सहभागी झाले होते.
१५ ऑगस्ट रोजी क्रिस्टोफर लक्सन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. पोस्टनुसार, ते ऑकलंड येथे भारतीय समुदायाच्या लोकांना भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान 'दमा दम मस्त कलंदर' हे गाणं वाजलं आणि ते ऐकताच पंतप्रधान लक्सन स्वतःला थिरकण्यापासून रोखू शकले नाहीत. भारतीय गायकी शिबानी कश्यप यांच्यासोबत स्टेजवर जोरदार डान्स केला. त्याच वेळी लक्सन यांनी विरोधी पक्षनेते क्रिस हिपकिन्स यांनाही स्टेजवर बोलावलं. त्यांच्या या कृतीने संपूर्ण हॉल टाळ्यांनी दणाणून गेला.
न्यूझीलंडमध्ये सध्या दोन लाखांहून अधिक भारतीय समुदाय राहतो आणि पाच दशलक्ष लोकसंख्येच्या देशात हा समुदाय खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या कार्यक्रमातील पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांचा हा सहभाग भारतीयांशी असलेलं नातं अधिक घट्ट करणारा ठरला.
क्रिस्टोफर लक्सन हे न्यूझीलंडचे ४२ वे पंतप्रधान असून त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी इस्रायल-गाझा संघर्षावर ठाम भूमिका मांडली होती. राजकारणाबरोबरच त्यांना व्यवसायातील मोठा अनुभव आहे. त्यांनी 'युनिलिव्हर' आणि 'एअर न्यूझीलंड'सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलं आहे.