जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ओटीटीसह थिएटरमध्ये धमाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:03 IST2025-07-01T16:52:52+5:302025-07-01T17:03:52+5:30
ओटीटी आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया.

जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ओटीटीसह थिएटरमध्ये धमाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
जुलैचा महिना खूप खास आहे. प्रेक्षकांना थिएटरसह ओटीटीवरही मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या आठवड्यात अॅक्शन, थ्रिलर ड्रामा आणि गूढ कथा यांचा सरसकट अनुभव देणारे नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. तर क्षणही वाया न घालवता, ओटीटी आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया.
बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित असा चित्रपट म्हणजे प्रियंका चोप्रा हिचा 'हेड ऑफ स्टेट'. प्रियंकानं या चित्रपटात जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम केलंय. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहेत उत्सुक आहेत. अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेला हा चित्रपट २ जुलै २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे.
अनुराग बसू दिग्दर्शित मेट्रो...इन दिनों (Metro...in Dino) हा चित्रपट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजेच ४ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि आदित्य चोप्रा दिसणार आहेत. याशिवाय, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अली फजल, अनुपम खेर आणि नीना गुप्ता हे देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'ज्युरासिक वर्ल्ड' फ्रँचायझीतील सातवा भाग 'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ' (Jurassic World Rebirth) या वर्षातील सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची खूप काळापासून चाहते वाट पाहत आहेत. हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'ज्युरासिक वर्ल्ड' या फ्रँचायझीचा एक मोठा ग्लोबल फॅनबेस आहे.
कमल हासन यांचा 'ठग लाईफ' ( Thug Life) हा चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. येत्या ०३ जुलै २०२५ रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स पाहता येईल. मणी रत्नम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ए.आर.रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलंय.
वेबसीरिजबद्दल बोलायचं झालं तर 'The Hunt: The Rajiv Gandhi Assassination Case' ही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित वेब सीरिज येत आहे. येत्या ४ जुलै २०२५ रोजी सोनी लिव्हवर ही वेब सीरिज पाहता येणार आहे.
करण जोहरचा शो 'द ट्रेटर' अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्याचे एकूण १० भाग आहेत, त्यापैकी ९ भाग आले आहेत. १० व्या भागात 'ट्रेटर'ची ट्रॉफी कोणाला मिळणार हे निश्चित केले जाईल. सध्या शोमध्ये उर्फी जावेद, पूरब झा, सुधांशू पांडे, जास्मिन भसीन आणि हर्ष आणि अपूर्वा सुरक्षित आहेत. तर येत्या ३ जुलै रोजी प्राइम व्हिडीओ फिनाले पाहता येणार आहे. याशिवाय 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनचा तिसरा एपिसोड लवकरच येतोय. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर ऋषभ पंत, युजवेंद्र चहल आणि अभिषेक शर्मा हे दिसतील. ५ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर हा एपिसोड पाहता येईल.