'तो काय माझा मित्र नाही, पण...' अनुराग कश्यपविषयी नवाजुद्दीने केलं स्पष्ट वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 16:13 IST2024-06-19T16:12:59+5:302024-06-19T16:13:52+5:30
Nawazuddin siddiqui: आम्ही एकत्र बसलो तर एकमेकांशी एकही शब्द बोलणार नाही, असंही नवाज यावेळी म्हणाला.

'तो काय माझा मित्र नाही, पण...' अनुराग कश्यपविषयी नवाजुद्दीने केलं स्पष्ट वक्तव्य
इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या कलागुणांना महत्त्व देण्यात आलं आहे. यातलाच एक अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui). आजवरच्या कारकिर्दीत नवाजने अनेक सुपरहिट सिनेमा, वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याने त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याच्याविषयी भाष्य केलं आहे.
अलिकडेच नवाजने 'इंडियन एक्स्प्रेस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनुरागसोबत काम करण्याचा अनुभव आणि एकंदरीत त्याच्या स्वभावाविषयी भाष्य केलं. "खरं सांगायचं झालं तर अनुराग कश्यप माझा मित्र नाहीये. जर आम्ही एकत्र बसलो तर मी काय किंवा तो काय अनेक तास एकमेकांशी बोलणार सुद्धा नाही. एकदा आम्ही एकाच फ्लाइटमध्ये होतो जवळपास ५ ते ६ तास आम्ही दोघंही एकमेकांशी एकाही शब्दाने बोललो नाही. पण तरीही अनुराग माझ्यासाठी खास आहे", असं नवाज म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "तो कायम स्वस्थ असावा आणि चांगले चांगले सिनेमा त्याने करावेत. मग त्याने मला त्याच्या सिनेमात नाही घेतलं तरी चालेल. पण, त्याने सिनेमा करत राहिलं पाहिजे. त्याच्यावर कोणतं संकट येऊ नये बास्स इतकंच वाटतं."
दरम्यान, गँग्स ऑफ वासेपुर व्यतिरिक्त अनेक प्रोजेक्टमध्ये अनुराग आणि नवाजुद्दीनने एकत्र काम केलं आहे. यात हड्डी, सेक्रेड गेम्स, रमन राघव 2.0 यांसारख्या प्रोजेक्टचा समावेश आहे.