गावात येणं बंद कर! प्रसिद्ध अभिनेत्यावर होती वडिलांची नाराजी, कारण ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:27 IST2025-11-13T15:23:54+5:302025-11-13T15:27:51+5:30
अभिनेत्याच्या भूमिका पाहून वडील संतापले. थेट घरी येण्याची बंदी घातली. कोण होता हा अभिनेता आणि काय होता हा किस्सा?

गावात येणं बंद कर! प्रसिद्ध अभिनेत्यावर होती वडिलांची नाराजी, कारण ऐकून थक्क व्हाल
बॉलिवूडचे अनेक अभिनेते आज लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरीही सुरुवातीच्या काळात या अभिनेत्यांना संघर्षाच्या काळाला तोंड द्यावं लागलं आहे. छोट्या भूमिका करुन या अभिनेत्यांनी आज स्वतःचं नाव कमावलं आहे. परंतु संघर्षाच्या काळात या अभिनेत्यांना त्याच्या कुटुंबाची नाराजी सहन करावी लागली होती. हा किस्सा अशाच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा. जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने एक खास स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui). नवाजुद्दीनने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये आपल्या संघर्षाच्या दिवसांतील एक अत्यंत भावनिक अनुभव सांगितला आहे. जेव्हा नवाजुद्दीनची एक भूमिका पाहून त्याचे वडील त्याच्यावर चांगलेच नाराज झाले होते. याशिवाय गावात येऊ नको, असंही वडिलांनी त्याला सांगितलं होतं.
नवाजुद्दीनने राज शमानीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, सुरुवातीच्या काळात नवाजुद्दीनला चित्रपटांमध्ये नेहमी मार खाण्याच्या भूमिका मिळत होत्या. 'सरफरोश' या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेसाठी नवाजुद्दीनला मारहाण सहन करावी लागली. पुढे 'मुन्ना भाई एम.बी.बी.एस.' मध्येही त्याने एका चोरट्याची भूमिका केली, ज्याला सतत मार खावा लागत असे.
नवाजुद्दीन म्हणाला की, ''"माझ्या गावातील लोक माझ्या वडिलांना सांगायचे, 'तुमचा मुलगा चित्रपटांमध्ये नेहमी मार खात असतो.' या गोष्टीमुळे वडील खूप अस्वस्थ झाले होते. आम्ही उत्तर प्रदेशातील आहोत, जिथे प्रत्येकाला आपल्या स्वाभिमानाबद्दल खूप काळजी असते."
वडिलांनी नवाजुद्दीनला विचारलं, "तू अशा भूमिका का करतोस?" यावर नवाजुद्दीनने उत्तर दिलं की, "मला दुसरं काही भूमिका मिळत नाहीयेत, पण मी प्रयत्न करत आहे," वडिलांचं पुढचं वाक्य नवाजुद्दीनच्या मनाला लागलं. बाबा नवाजुद्दीनला म्हणाले, "तर मग मार खाल्ल्यानंतर इथे गावी येऊ नको." वडिलांचे हे शब्द ऐकून नवाजुद्दीनला इतकं दुःखं झालं की, तो तब्बल पुढे तीन वर्षांपर्यंत आपल्या गावी गेला नाही.
'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर वडिलांची मिळाली शाबासकी
नवाजुद्दीन सिद्दीकीला खरी ओळख मिळाली ती २०१२ साली आलेल्या अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' सिनेमामुळे. या कल्ट क्लासिक चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे आणि संवादफेकीचं खूप कौतुक झालं. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर नवाजुद्दीन पुन्हा गावी गेला आणि त्याने वडिलांना विचारलं, "आता काय वाटतं?" तेव्हा वडिलांनी हसून उत्तर दिले, "यावेळी तू चांगले काम केले आहे.", असं म्हणत वडिलांनी नवाजुद्दीनला शाबासकी दिली.