ब्रेकअपनंतर 'ये जवानी है दीवानी'च्या सेटवर कसे होते रणबीर-दीपिका? 'धुरंधर' फेम अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:28 IST2026-01-07T13:28:23+5:302026-01-07T13:28:52+5:30
ब्रेकअपनंतरही रणबीर दीपिकाची केमिस्ट्री गाजली होती.

ब्रेकअपनंतर 'ये जवानी है दीवानी'च्या सेटवर कसे होते रणबीर-दीपिका? 'धुरंधर' फेम अभिनेता म्हणाला...
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणचा 'ये जवानी है दिवानी' सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कायमच चाहत्यांवर भुरळ पाडते. दोघांनी आधी 'बचना ऐ हसीनो'मध्ये काम केलं होतं. तेव्हा ते खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत होते. मात्र काही वर्षांनी त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतरही त्यांनी 'ये जवानी है दिवानी' आणि 'तमाशा' हे दोन हिट सिनेमे केले. ब्रेकअपनंतर 'ये जवानी है दीवानी'च्या सेटवर ते कसे होते? नुकतंच एका अभिनेत्याने याचा खुलासा केला आहे.
'धुरंधर' सिनेमात दिसलेला अभिनेता नवीन कौशिक 'ये जवानी है दीवानी'मध्येही होता. सेटवर दीपिका आणि रणबीर यांच्यात कसा बाँड होता यावर त्याने प्रतिक्रिया दिली. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत नवीन कौशिक गंमतीत म्हणाला, "मला तर वाटत होतं की दोघांचं भांडण होईल, थोडा ड्रामा पाहायला मिळेल आणि मग आम्हाला गॉसिप करायची संधी मिळेल. पण असं काहीच झालं नाही. सगळं काही चांगलं होतं. दोघंही खूप प्रोफेशनल होते. कामात लक्ष देत होते आणि वैयक्तिक गोष्टी त्यांनी कधीच कामात आणल्या नाहीत."
तो पुढे म्हणाला, "सिनेमाचं शूट खूप थकवणारं होतं. माझं शूट जास्त दिवस नव्हतं पण लोकेशनच असे होते की मनालीत आम्हाला ट्रेकिंग करावं लागत होतं. बर्फात शूट करायचं होतं. हे खूप मेहनतीचं काम होतं. शूट करताना जेव्हा आम्हाला ब्रेक मिळायचा तेव्हा पूर्ण कास्ट आणि क्रू एकत्र वेळ घालवायचे. कधी पार्टी व्हायची तर कधी आम्ही एकत्र बसून गप्पा मारायचो. रणबीर, दीपिका, कल्की आणि आदित्य यांच्यात जशी ऑनस्क्रीन केमिस्ट्री होती तशीच ऑफस्क्रीनही होती. सेटवर सर्वांचा दोस्ताना आणि जॉयफुल अंदाज असायचा."
दीपिका पादुकोणची स्तुती करताना नवीन कौशिक म्हणाला, "मी सर्वांना हेच सांगतो की दीपिका सर्वात जास्त प्रोफेशनल आहे. ती नेहमी वेळेवर आणि पूर्ण तयारीने यायची. कामासंबंधी ती खूप सीरियस असायची. काही ड्रामा नाही, कोणतीही मागणी नाही फक्त काम आणि चेहऱ्यावर गोड स्माईल हीच तिची खासियत आहे."
रणबीरबद्दल तो म्हणाला, "मी रणबीरसोबत 'रॉकेट सिंग' मध्येही काम केलं होतं. जेव्हा आम्ही ये जवानीच्या सेटवर परत भेटलो तेव्हा रणबीरने माझ्या करियर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही विचारपूस केली. रॉकेट सिंग नंतर माझं आयुष्य कसं आहे, काम मिळतंय का असे प्रश्न त्याने विचारले. एवढा मोठा अभिनेता अशी विचारपूस करतो हे खूप विशेष आहे."