बॉलिवूडला केवळ सलमान खानच्याच चित्रपटांसाठी ओळखले जाऊ नये- नसीरूद्दीन शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 15:20 IST2018-10-29T15:20:09+5:302018-10-29T15:20:34+5:30
समाजासाठी अधिकाधिक प्रगल्भ, उत्तम सिनेमा बनवण्याची जबाबदारी आपली आहे, असे नसीरूद्दीन म्हणाले.

बॉलिवूडला केवळ सलमान खानच्याच चित्रपटांसाठी ओळखले जाऊ नये- नसीरूद्दीन शाह
भारतीय चित्रपटांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते नसीरूद्दीन शाह लाईमलाईट पासून दूर राहणे पसंत करतात. पण या अभिनेत्याचे भारतीय सिनेसृष्टीतील योगदान कुणीही नाकारू शकत नाही.
अलीकडे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत नसीरूद्दीन शाह यांनी भारतीय सिनेमाबद्दल अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवलीत. सिनेमा हा भावी पिढ्यांसाठी असतो. समाजासाठी अधिकाधिक प्रगल्भ, उत्तम सिनेमा बनवण्याची जबाबदारी आपली आहे, असे नसीरूद्दीन यावेळी म्हणाले.
सिनेमा समाजाला बदलू शकत नाही, ना सिनेमा क्रांती घडवू शकत. सिनेमा शिक्षणाचे माध्यम आहे, हेही ठामपणे मी सांगू शकत नाही. डॉक्युमेंटरी शिक्षण देऊ शकतात. पण चित्रपट हे काम करू शकत नाहीत. लोक मनोरंजक चित्रपट बघतात आणि विसरून जातात. केवळ गंभीर, समांतर चित्रपट हेच लोकांवर त्या-त्या काळाची छाप सोडतात. हेच कारण आहे की, मी ‘अ वेन्सडे’, ‘रोगन जोश’ सारख्या चित्रपटांत काम केले. अशा चित्रपटांचा भाग बनणे मी माझी जबाबदारी मानतो. मी केलेल्या सगळ्या गंभीर भूमिका काळाचे प्रतिनिधित्व करतात. सिनेमा आजही आहे, पुढेही असेल. या चित्रपटांना २०० वर्षांनंतरही बघितले जाईल. माझ्या मते, २०१८ मध्ये भारतीय सिनेमा कसा होता, हे लोकांना कळायला हवे. असे होता कामा नये की, भावी पिढ्यांनी मागे वळून बघितले असता २०१८ हे वर्षे त्यांना केवळ सलमान खानच्या चित्रपटांचे वर्ष म्हणून ओळखले जावे, असेही नसीरूद्दीन शाह म्हणाले.