"हा तो देश नाही, जिथे मी मोठा झालो..." नसीरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:23 IST2026-02-06T12:23:25+5:302026-02-06T12:23:48+5:30
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह चर्चेत आले आहेत.

"हा तो देश नाही, जिथे मी मोठा झालो..." नसीरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर थेट निशाणा
आपल्या रोकठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका लेखात त्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनावर जोरदार घणाघात केलाय. मुंबई विद्यापीठाने 'जश्न-ए-उर्दू' कार्यक्रमाचे निमंत्रण शेवटच्या क्षणी नाकारल्यामुळे संतापलेल्या शाह यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाने १ फेब्रुवारी रोजी 'जश्न-ए-उर्दू' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी नसीरुद्दीन शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ३१ जानेवारीच्या रात्री त्यांना अचानक कळवण्यात आले की, "तुम्ही उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही". आश्चर्याची बाब म्हणजे, आयोजकांनी प्रेक्षकांना असे सांगितले की खुद्द शाह यांनीच येण्यास नकार दिला आहे. या प्रकाराला शाह यांनी "अपमानजनक" म्हटले आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी अशी शंका व्यक्त केली की, सध्याच्या राजकीय वातावरणावर त्यांनी केलेल्या सार्वजनिक टीकेमुळेच कार्यक्रमातून वगळण्यात आले असावे. ते लिहितात, "एका वरिष्ठ विद्यापीठ अधिकाऱ्याने कथितरित्या असे म्हटले की शाह 'उघडपणे देशाविरुद्ध बोलतात'. मी या दाव्याला थेट आव्हान देतो. मी देशाविरुद्ध बोललो आहे, असा एकही पुरावा त्यांनी दाखवावा". पुढे नसीरुद्दीन शाह विचारतात, "अशी शत्रुत्व किती काळ चालू राहू शकते? हा तो देश नाही, जिथे मी मोठा झालो, जिथे मला प्रेम करायला शिकवले गेले".
केंद्र सरकारवर घणाघाती टीका
इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात ७५ वर्षीय शाह यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत "मी कधीही स्वतःला 'विश्वगुरू' म्हणवणाऱ्यांची प्रशंसा केली नाही. उलट त्यांच्या वागणुकीवर मी सातत्याने टीका केली आहे. त्यांचा अहंकार मला खटकतो आणि गेल्या दहा वर्षांत त्यांनी केलेल्या कोणत्याही कामाने मी प्रभावित झालेलो नाही. मी सत्ताधारी सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका केली आहे आणि पुढेही करत राहीन".