शाहिद-तृप्तीवर नाराज झाले नाना पाटकेर? 'ओ रोमियो'च्या इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:51 IST2026-01-21T18:50:13+5:302026-01-21T18:51:05+5:30
शाहिद-तृप्तीची दीड तास वाट पाहिली अन् नाना पाटेकर निघून गेले, ट्रेलर लाँचपूर्वीच सोडला कार्यक्रम

शाहिद-तृप्तीवर नाराज झाले नाना पाटकेर? 'ओ रोमियो'च्या इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. नाना पाटेकर त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज मुंबईत आयोजित 'ओ रोमियो' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात आला आहे.
'ओ रोमियो' चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबईत पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर ठरलेल्या वेळेत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्यासोबत फोटोग्राफर्सना पोझही दिल्या. यानंतर नानांनी ट्रेलर अधिकृतपणे लाँच होण्यापूर्वीच तिथून काढता पाय घेतला. जेव्हा सर्व कलाकारांना स्टेजवर बोलावण्यात आले, तेव्हा होस्टने शाहिद, तृप्ती आणि अविनाश तिवारी यांच्यानंतर नाना पाटेकर यांचे नाव मोठ्या उत्साहात पुकारले. मात्र, नाना पाटेकर तिथे उपस्थित नव्हते. दरम्यान, या ट्रेलर लाँच सोहळ्यात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी तब्बल दीड तास उशिरा पोहोचले होते.
सोशल मीडियावर नाना पाटेकर यांच्या रागाबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, अद्याप चित्रपट टीम किंवा नानांच्या वतीने अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. शाहिद, तृप्तीवर नारज होत नानांनी कार्यक्रम सोडल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर काही लोकांच्या मते, नानांना इतर महत्त्वाच्या कामासाठी जायचे असल्याने ते लवकर निघाले असावेत. कारण, त्यांनी कार्यक्रम सोडल्यानंतरही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणि फीडवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.
'ओ रोमियो' या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले असून यामध्ये शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर यांच्यासह विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया, दिशा पटानी आणि अविनाश तिवारी या तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर यांनी यापूर्वी 'कमीने' आणि 'हैदर' सारखे क्लासिक चित्रपट दिले आहेत. आता 'ओ रोमियो'च्या माध्यमातून ही जोडी तिसऱ्यांदा एकत्र आली आहे. तर नाना आणि शाहिद 'पाठशाला' सिनेमानंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत.