"लग्न करण्यासाठी आईने माझ्यावर…", अभिनेत्री मुनमुन दत्ताचा खुलासा, नेमकं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:19 IST2025-05-13T10:18:36+5:302025-05-13T10:19:23+5:30
मुनमुनने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलेपणानं भाष्य केलं.

"लग्न करण्यासाठी आईने माझ्यावर…", अभिनेत्री मुनमुन दत्ताचा खुलासा, नेमकं काय म्हणाली?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah)मधील 'बबिता'अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta)हिचा मोठा चाहतावर्ग आहे. सौंदर्य,स्टाईल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिनं छोट्या पडद्यावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. ३७ वर्षीय ग्लॅमरस मुनमुन ही अजून सिंगल आहे. तिचे चाहते कायम तिला लग्न कधी करणार हे विचारताना दिसून येतात.अशातच आता अभिनेत्रीनं सध्या लग्नाचा विचार नसून या निर्णयामध्ये तिची आईही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं सांगितलंय.
मुनमुनने नुकतंच'ई टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलेपणानं भाष्य केलं. ती म्हणाली, "आईनं कधीच माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकलेला नाही. उलट ती नेहमी सांगते की, तुझ्या करिअरवर आणि आयुष्यावर लक्ष केंद्रित कर. प्रवास कर, शिक, अनुभव घे. लग्न हा जीवनाचा एक भाग असू शकतो, पण तो संपूर्ण जीवन नव्हे".
मुनमुनच्या मते, लग्नाबाबत समाजात अजूनही पारंपरिक विचार prevalent आहेत. ती म्हणाली, "गावाकडं जेव्हा कोणी माझ्या लग्नाबद्दल विचारतं, तेव्हा माझी आई अभिमानानं सांगते की, माझ्या मुलीला सध्या लग्न करायचं नाही आणि मी तिच्या निर्णयाच्या पूर्णपणे पाठीशी आहे. हे ऐकून मला खूप बळ मिळतं", असंही मुनमुन म्हणाली.
फक्त लग्नच नव्हे, तर आपल्या संघर्षांचाही मुनमुनने उल्लेख केला. तिनं सांगितलं, "मी करिअरच्या सुरुवातीला खूप आर्थिक अडचणींना सामोरं गेले. फोटोशूटसाठी आणि घराच्या भाड्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा आईनं वडिलांना न सांगता तिनं साठवलेले पैसे मला दिले. तिच्यामुळे मी पुढे जाऊ शकले".