Mumbai Rave Party On Cruise:'NCBनेच तिथे ड्रग्ज ठेवले, सीसीटिव्हीत दिसेल', आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटने केला खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 13:48 IST2021-10-07T13:48:22+5:302021-10-07T13:48:54+5:30
Mumbai Rave Party On Cruise:आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटने केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे.

Mumbai Rave Party On Cruise:'NCBनेच तिथे ड्रग्ज ठेवले, सीसीटिव्हीत दिसेल', आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटने केला खळबळजनक दावा
मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीत ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांच्यासह आतापर्यंत एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट सध्या एनसीबीच्या कोठडीमध्ये आहेत. मुंबईतल्या एका क्रूझवर टाकलेल्या छाप्यामध्ये त्यांना ड्रग्जसोबत अटक करण्यात आले असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटने जामिनासाठी अर्ज केला आहे आणि त्यावेळी त्याने खळबळजनक दावा केला आहे. तो म्हणाला की, एनसीबीनेच तिथे ड्रग्ज ठेवले असून सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे दिसून येईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अरबाज मर्चंटने बुधवारी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यासोबतच अरबाजने मुंबई पोर्ट ट्रस्टमधील इंटरनॅशनल टर्मिनलच्या ग्रीन गेटवरचे सीसीटिव्ही फुटेज देण्याची मागणीदेखील केली आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३० मिनिटांपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी त्याने केली आहे. तसेच, सीआयएसएफने त्याची एक कॉपी ठेवावी, असे देखील त्याने म्हटले आहे. अरबाझ मर्चंटने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, सीसीटीव्हीमध्ये हे दिसून येईल की प्रवेश करताना माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाहीत आणि ते एनसीबीनेच तिथे ठेवले होते.
दरम्यान, अतिरिक्त न्यायदंडाधिकारी आर. एम. नारळीकर यांनी एनसीबीला सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात नोटीस पाठवली असल्याचे समजते आहे. अरबाज मर्चंटच्या या दाव्यानंतर आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे.