'ही' मराठी मालिका पाहतेय बॉलिवूड गाजवणारी मृणाल ठाकूर, म्हणाली "माझ्या आईची आवडती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:13 IST2025-10-13T13:19:32+5:302025-10-13T14:13:20+5:30
मृणाल ठाकूरच्या घरीही मराठी मालिकेची क्रेझ, अभिनेत्रीनं शेअर केला व्हिडीओ

'ही' मराठी मालिका पाहतेय बॉलिवूड गाजवणारी मृणाल ठाकूर, म्हणाली "माझ्या आईची आवडती..."
Mrunal Thakur : मराठी मालिका आणि प्रेक्षक वर्ग हे नातं फार जुनं आणि जिव्हाळ्याचं आहे. मालिका, त्यातील पात्रं प्रेक्षकांना आपल्या कुटुंबातील सदस्यच वाटतात. मराठी प्रेक्षकांसाठी मराठी मालिका हा विषय नेहमीच भावनिक आणि अत्यंत आवडीचा राहिला आहे. फक्त सामान्य प्रेक्षकचं नाही तर आता बॉलिवूडच्या स्टार्सनाही मराठी मालिकांची भूरळ पडली आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय मालिका पाहत असल्याचं दिसलं. नुकतंच मृणालने एक व्हिडिओ शेअर करत तिच्या घरात कोणती मराठी मालिका आवडीने पाहिली जाते, याचा खुलासा केला. तर ती मालिका कोणती, याबद्दल जाणून घेऊया.
मृणाल ठाकूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या आईसोबत बसलेली दिसतेय. मृणालच्या केसांना तिची आई टिव्ही पाहात-पाहात तेल लावत असल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये मृणाल म्हणते, "मराठी मालिका, तेल, आईच्या हातची केसांची चंपी आणि दोन वेण्या... माझ्या आईची आवडती मालिका... रविवारचं काम" असं म्हटलं. व्हिडीओमध्ये मृणालनं मालिकेची झलक प्रेक्षकांना दाखवली. मृणाल ठाकूर आणि तिची आई या 'झी मराठी'ची 'तुला जपणार आहे' ही मालिका पाहत असल्याचं दिसलं.
मृणाल ठाकूर सध्या मोठ्या पडद्यावर विविध भूमिका साकारत असली, तरी ती अजूनही आपल्या मुळांशी जोडलेली आहे. हे पाहून तिच्या चाहत्यांना आणि मराठी प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. मृणाल मूळची धुळ्याची आहे. मराठी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिने अभिनयाची सुरुवातही मराठीतूनच केली होती. नंतर तिने हिंदी मालिकेतूनही स्वत:ची वेगळी छाप पाडली. आज ती हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री बनली आहे. ''सीतारामम', 'हॅलो पापा', 'जर्सी', 'बाटला हाऊस', 'द फॅमिली स्टार' मध्ये दिसली आणि 'सन ऑफ सरदार २' या सिनेमांमध्ये ती दिसली आहे.