टायगर श्रॉफच्या या चित्रपटातील अॅक्शनसाठी वापरलेत १०० किलोहून अधिक स्फोटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 17:03 IST2020-02-17T17:03:11+5:302020-02-17T17:03:54+5:30
Baaghi 3 Movie : टायगर श्रॉफचा आगामी या सिनेमात प्रेक्षकांना पहायला मिळणार दमदार अॅक्शन

टायगर श्रॉफच्या या चित्रपटातील अॅक्शनसाठी वापरलेत १०० किलोहून अधिक स्फोटके
बॉलिवूडचा बागी म्हणजेच अभिनेता टायगर श्रॉफ अभिनित आगामी चित्रपट बागी ३ ची घोषणा जेव्हापासून करण्यात आली आहे तेव्हापासूनच हा चित्रपट चर्चेत आला आहे. बागी फ्रेंचाईजीच्या या तिसऱ्या भागात आणखी एक धमाकेदार डोस प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
चित्रपट निर्मात्यांनी अॅक्शन सिक्वेन्स खरा वाटावा याकरीता चक्क अंदाजे १०० किलो स्फोटकांचा वापर केला आहे. ही स्फोटके वापरताना सुरक्षेची पूर्ण काळजीही घेण्यात आली होती. अहमद खान यांनी म्हटले आहे,‘ आम्ही बागी ३ मधील एका सीनसाठी ९० ते ९५ ब्लास्ट एकत्र चित्रीत केले आहेत. हा सीन शूट करणे ही आमच्यासाठी थोडी भीती आणि चिंतेची गोष्ट होती कारण त्यात टायगर स्वत: सीन करत होता. हे खूप खरतनाक स्टंट होते. यामध्ये कोणत्याही व्हीएफएक्सचा वापर करण्यात आलेला नाही.’
या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत असलेला टायगर श्रॉफ आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी टायगरने बॉडी डबल्सचा वापर न करता स्वत:च सगळे परफॉर्म केले आहेत. इतकेच नव्हे तर चित्रपटाच्या अॅक्शन सिक्वेन्ससाठी कोणत्याही व्हीएफएक्सचा वापर न करता खऱ्या बॉम्बचा वापर करण्यात आला आहे ,ज्याची एक झलक चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलरमध्ये पहाण्यास मिळाली होती.
'बागी ३' मध्ये टाइगर, श्रद्धा आणि रितेश यांच्यासोबत अंकिता लोखंडे, दानिश भट, विजय वर्मा, जयदीप अहलावत आणि जमील खौरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. साजिद नाडियादवाला यांच्यातर्फे निर्मित हा चित्रपट या वर्षी ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.