Money laundering case: ‘जॅकलिनने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला’, कोर्टात ED चा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 15:15 IST2022-11-10T15:15:24+5:302022-11-10T15:15:31+5:30
Money laundering case: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन अडकली आहे. तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

Money laundering case: ‘जॅकलिनने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला’, कोर्टात ED चा मोठा दावा
नवी दिल्ली: 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर गुरुवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि जॅकलिन फर्नांडिस यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणाचा निर्णय उद्या येऊ शकतो. सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने जॅकलिनवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. कोर्टात ईडीने दावा केला की जॅकलिनने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
जामीन अर्जावरील चर्चेदरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले की, डिसेंबर 2021 मध्ये जॅकलिनने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कोर्टात जॅकलिनच्या वकिलाने युक्तिवाद केला की, जॅकलीन तपासात सहकार्य करत असून तिचे पाच वेळा जबाब नोंदवण्यात आले आहेत. यादरम्यान, ईडीने जामिनाला विरोध केला आणि म्हटले की, तपासात सहकार्य करणे म्हणजे आरोपी देश सोडू शकत नाही किंवा पुराव्यांशी छेडछाड करू शकत नाही, असे होत नाही.
EDचे जॅकलिनवर आरोप
सुनावणीदरम्यान, तपास यंत्रणेने न्यायालयात दावा केला की, जॅकलिनकडे पैशांची कमतरता नसल्याने, ती देश सोडून पळून जाण्यासाठी सर्व डावपेच केले. ईडीचा या प्रकरणी तपास सुरुच आहे. ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, एजन्सीने या प्रकरणाचा गंभीरपणे तपास केला आहे. एजन्सीने असेही म्हटले की, अभिनेत्रीने तिच्या चौकशीदरम्यान प्रत्येक प्रश्नाची उत्तरे फिरवून केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलीनचेही 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून नाव दिले आहे. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे. जॅकलिनला या फसवणुकीची माहिती होती, असे असतानाही तिने सुकेशकडून भेटवस्तू घेतल्या. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या. त्या भेटवस्तूंमुळे जॅकलिन या प्रकरणात अडकली. आता उद्या न्यायालय जॅकलिनच्या जामिनावर निकाल देऊ शकते, असे मानले जात आहे.